Home » श्री गणेश मंडळांनी आत्मचिंतन करावे

श्री गणेश मंडळांनी आत्मचिंतन करावे

by Navswaraj
0 comment

– नरेंद्र कराळे अकोला

अकोला येथील अनंत चतुर्दशीला काढण्यात येणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची १३० वर्षांची परंपरा आहे. पूर्वी मिरवणुकीत लहान- मोठे शंभरवर मंडळ आणि व्यायाम शाळा सहभागी होत असत. नागरिकात देखील एक प्रकारचा उत्साह असायचा. व्यायाम शाळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, विद्युत रोषणाई, देखावे तसेच आकर्षक गणेश मूर्ती बघण्यासाठी महिला व लहान मुलांची रात्री गर्दी असे. विसर्जन मिरवणुकीत शिस्त होती. मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलण्याचा प्रयत्न देखील झाला परंतु त्याला मंडळांनी प्रतिसाद दिला नाही.

काही वर्षांपासून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या संख्येत घट झाली आहे. मानाचे गणपती वेळेवर निघतात त्यांचे सायंकाळी वेळेवर विसर्जन पण होते. मानाच्या गणपती नंतर, गणपतींमध्ये इतके अंतर असते की शेवटचे गणेशमंडळ सायंकाळी उशिरापर्यंत जुने शहरातच असते. दोन मंडळातील अंतर आणि विनाकारणच्या विलंबामुळे अनेक कार्यकर्ते आणि गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडते. जसजसा उशीर होतो तसे टिळक आणि गांधी मार्गावरील गणेशभक्त घरचा मार्ग धरतात. त्यामुळे प्रात्यक्षिक करायचे कोणासमोर? यामुळे अनेक जुन्या आणि नामंकित व्यायाम शाळा मिरवणुकीत सहभागी होत नाहीत.

श्री गणेशोत्सवाची तयारी मंडळ पाच- सहा महिने आधीपासून तन, मन आणि धनाने करतात. हे वाया जाऊ नये म्हणून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व मंडळांनी शिस्त व वेळेचे पालन करावे. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा अखंडपणे सुरू राहावी असे गणेशभक्तांना वाटते, या दृष्टीकोनातून सर्व मंडळांनी सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!