Home » तीन दशकांनंतर उद्धव यांनी वापरली बाळासाहेबांची ‘तीच’ युक्ती

तीन दशकांनंतर उद्धव यांनी वापरली बाळासाहेबांची ‘तीच’ युक्ती

by Navswaraj
0 comment
– प्रसन्न जकाते

नागपूर : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख यांनी तीच युक्ती वापरली जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजपासून 30 वर्षांपूर्वी वापरली होती.  1992 मध्येही शिवसेनेत फूट पडली होती.

बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी माधव देशपांडे यांनी शिवसेनेवर असेच आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी उध्दव आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील हस्तक्षेपाचा मुद्दा उचलला होता. त्यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात बाळासाहेबांनी लेख प्रकाशित केला होता. त्या लेखात बाळासाहेबांनी म्हणले होते की, जर कोणी माझ्या समोर येऊन मला अडचण सांगितली की, ठाकरे घराण्यामुळे पक्ष सोडला तर त्या वेळी मी पक्षाचे प्रमुख पद सोडुन देईन. मीच नाही तर माझे सगळे कुटुंब शिवसेना सोडेल. बाळासाहेबांचा लेख वाचून शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. मातोश्री बाहेरही मोठा जमाव जमला. शिवसेनेतील पदाधिकारी आणि सगळ्यांनी बाळासाहेबांची मनधरणी केली.

तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत मोठे वादळ आले. या वादळला काही प्रमाणात उद्धव यांचे सुपुत्र तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बऱ्याच प्रमाणात शिवसेना नेते खा. संजय राऊत कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. 30 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी लेख लिहिला आणि 30 वर्षांनंतर उद्धव यांनी फेसबुकने संवाद साधला. फरक होता तो फक्त तंत्रज्ञानाचा बाकी उद्धव यांचे शब्द जसेच्या तसे बाळासाहेबांसारखे होते.

उद्धव यांचे फेसबुक लाईव्ह संपताच 30 वर्षांनंतर पुन्हा मुंबईत शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली, पण यावेळी ती मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगला आणि मातोश्री दोन्ही ठिकाणी होती. फरक इतकाच की शिवसैनिकांनी यावेळी वर्षावरून मातोश्रीवर जाणाऱ्या उद्धव यांच्यावर फुलांची उधळण केली.

शिवसेनेत बंडखोरी नवी नाही. शिवसेनेला मोठा धक्का ओबीसी नेता छगन भुजबळ यांनी. 18 आमदार सोबत घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले. पण त्याच दिवशी सायंकाळपर्यंत 18 पैकी 12 आमदार शिवसेनेत परतले. या बंडखोरीनंतर बाळासाहेब आणि भुजबळ वाद इतका पेटला की, वर्ष 2000 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना बाळासाहेबांना अटक करण्यापर्यंत भुजबळ यांची मजल गेली. त्याच भुजबळ यांच्या सोबत उद्धव खुर्चीला खुर्ची लावून बसले म्हणून भाजपने अनेकदा त्यांच्यावर टीका केली, तर शिवसेनेतील खरा बाळासाहेब भक्त नाराज होता. त्यानंतर 2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्ष सोडुन काँग्रेस प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसमध्ये जाण्याच्या काही दिवसांपूर्वी उद्धव आणि राणे यांचा वाद झाला होता. त्यावेळी बाळासाहेब मौन राहिले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या वेळीही नेमके हेच घडले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे आणि शिंदे यांचा चांगलाच वाद झाला. संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतली आणि यंदा उद्धव मौन राहिले.

राणे यांच्या नंतर शिवसेनेला ‘इनहाऊस’ धक्का दिला तो राज ठाकरे यांनी. 2006 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा उद्धव यांच्या हाती देताच राज नाराज झाले आणि त्यांनी यापुढे आपण ‘मनसे’ काम करेंगे असे ठरविले. शिवसेनेतून बाहेर पडताच त्यांनी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेची स्थापना केली. एक वेळ अशी होती की राज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करायचे. मग त्यांनी मोदींना टार्गेट केले. अलीकडे पुन्हा त्यांनी मोदी, कट्टर हिंदुत्व, मशिदिंवरील भोंगे असे शिवसेना स्टाईल मुद्दे हाती घेतले, जणू काही शिवसेनेला राज्यात लवकरच पर्याय लागणार आहे, हे त्यांना कळले असावे. राज यांच्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एक बुरुजच एकनाथ शिंदे यांनी पाडला. मंत्री, खासदार, आमदार अशी संपूर्ण शिवसेनाच त्यांनी हादरविली.

एकनाथ शिंदे यांनी हे ‘धनुष्य’ एकट्याने नक्कीच पेललेले नाही. शिवसेना खलास केली तर त्यांच्या आयुष्यात ‘कमळ’ फुलविण्याची नक्कीच त्यांना मोठी ऑफर आहे. आता शिंदे यांनी भात्यातून काढत उद्धव यांच्या दिशेने सोडलेले ‘बाण’ कोणाला किती तीक्ष्णतेने लागतात हे लवकरच कळेल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!