Home » आमदार राणांच्या या ‘दुश्मन’ला भेटले बच्चू कडू

आमदार राणांच्या या ‘दुश्मन’ला भेटले बच्चू कडू

by नवस्वराज
0 comment

अमरावती : सध्या युवा स्वाभिमान पक्षाचे नेते व बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे अनेक दुश्मन तयार झाले आहेत, नव्हे त्यांनी स्वत:हुन तयार करून घेतल्याचे बोलले जाते. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, अशी हिंदीत एक म्हण आहे. अशात आमदार राणांचा एक असाही दुश्मन आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी त्यांच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला होता. हा दावा करणाऱ्या व्यक्तीची प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी घरी जाऊन भेट घेतली.

युवा स्वाभिमान पक्षाने अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे ११ सप्टेंबर रोजी दहीहंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी राणा यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात अपशब्दांचा वापर केला. यावरून तेथे वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते महेंद्र दिपटे आणि आमदार राणा यावेळी थेट समोरासमोर भीडले. त्याचे फोटोही व्हायरल झालेत. या झटापटीत आपण राणांच्या कानशिलात हाणल्याचा दावा दिपटे यांनी केला. यावेळी दिपटे यांनाही राणा समर्थकांकडुन मारहाण झाली होती. मारहाणीत दिपटे यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाले. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. दिपटे यांची प्रकृती बिघडली. हे प्रकरण नंतर पोलिसांपर्यंतही गेले. सध्या प्रकृती ठिक नसल्याने दिपटे घरीच उपचार घेत आहेत. अशात आमदार बच्चू कडू यांनी दिपटे यांचे घर गाठत त्यांची आस्थेने विचारपूस केली. आमदार बच्चू कडू आणि महेंद्र दिपटे हे पूर्वीचे सहकारी आहेत. नव्वदीच्या दशकात बच्चू कडू शिवसेनेत असताना त्यांनी सोबत काम केले आहे. राणांसोबत झालेल्या वादाची माहिती मिळाल्यानंतर बच्चू कडू यांना जुन्या मैत्रीचे स्मरण झाले व ते तातडीने दिपटे यांच्या घरी पोहोचले.

आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यात सत्तांतरानंतर वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात मध्यस्थी करावी लागली होती. लोकसभा निवडणुकीत पैसे वाटपाबाबत खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली व पुन्हा राणा विरुद्ध बच्चू कडू या वादाला नव्याने सुरुवात झाली. अशात बच्चू कडू आपला जुना सहकारी मित्र महेंद्र दिपटे याला भेटल्याने अमरावती जिल्ह्यात पुन्हा राणा विरुद्ध कडू हा वाद पेटतो की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!