अकोला : जोरदार पावसामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या, अनेक रस्ते आणि भागात पाणी साचले. त्यामुळे सांडपाण्याच्या नाल्यांचे बांधकाम तसेच महानगरपालिकेच्या नाल्या सफाई बाबत नागरिकांचा ओरडा सुरू झाला. महानगरपालिकेने योग्य नियोजन करून नाल्यांचे बांधकाम केलेले नाही. काही नाल्या अरूंद असून खोली कमी आहे, तर जोड नाल्यांची उंची खूप जास्त आहे. काही सफाई कर्मचारी कामचुकारपणा करत असतील, परंतु यासाठी फक्त महानगरपालिका प्रशासनच जबाबदार नाही.
बऱ्याच नागरिकांनी नाले तसेच नाल्या बुजवून त्यावर बांधकाम केले आहे. कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या असूनही बरेच नागरीक आणी व्यवसायिक घरातील तसेच प्रतिष्ठानातील कचरा, कॅरीबॅग, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने सामान नालीत टाकतात, रस्त्यावर व्यवसाय करणार्यांबाबत न बोललेलेच बरे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे साहीत्य आणि मलमा नालीत जातो. त्यात वाहून आलेली रेती काढून त्याची विक्री केल्या जाते. परिणामी जोरदार पाऊस झाल्यास नाल्या तुंबुन त्यातील घाण पाणी आणि कचरा रस्त्यावर व वाट मिळेल तेथे वहात जाऊन साचतो.
महानगरपालिका प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. परंतु नागरीकांना देखील आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे.