Home » बुलडाणा जिल्हा बँकेने पाठविल्या जप्ती बोजाच्या नोटीस

बुलडाणा जिल्हा बँकेने पाठविल्या जप्ती बोजाच्या नोटीस

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : दी बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांसह शेतकरी नेतेही संतापले आहे. बँकेच्या या निर्णयाच्या विरोधात आता आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या सातबारावर बँकेने चक्क जप्ती बोजा चढविल्याच्या नोंद केली आहे. या नोंदी करत बँकेने विश्वासघात केल्याच्या आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे.

बँका पीक कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या जमिनीवर म्हणजेच सातबारा उताऱ्यावर बोजा चढवतात. मात्र बुलडाण्यातील बँकेने सातबारावर जप्ती बोजा चढविला आहे. या प्रकारामुळे दीड लाख रुपयांचे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम थकीत असलेले सुमारे तीन हजारांवर कर्जदार शेतकरी चांगलेच हादरले आहेत. राज्य सरकारने यात लक्ष द्यावे आणि दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना तारावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बँकेकडुन करण्यात आलेल्या या प्रकाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच संतापले आहेत. यासंदर्भात आक्रमक प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की बँकांनी आधी धनाढ्य व कर्जबुडव्यांकडुन वसुली करावी. अनेक राजकीय नेतेही थकबाकीदार आहेत. त्यांना दिलेले कर्ज आधी वसूल करण्यात यावे. त्यानंतरही शेतकऱ्यांकडुन कर्जवसुलीचा विचार करावा. शेतकऱ्यांकडे बळजबरीने कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रसंगी बदडून काढण्यात येईल, असा ईशाराही तुपकर यांनी दिला आहे.

बँकेनेही यासंदर्भात आपली बाजू मांडली आहे. जप्ती बोजा चढविण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू केली होती, पण त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. असे सांगण्यात आले. परंतु, ज्या शेतकऱ्यांना अशा नोटीस गेलेल्या आहेत, केवळ त्यांच्याच सातबारावर बोजा चढला गेला आहे, असे जिल्हा बँकेंचे प्रशासक खरात यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात नेमके सत्य ते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेच्या या कारवाईमुळे सध्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची एकूणच आर्थिक परस्थिती पाहता बँकेने वस्तुस्थितीच्या आधारावर निर्णय घ्यावा अशी मागणीही पुढे आली आहे.

error: Content is protected !!