Home » राष्ट्रीय ध्वजाचा मान राखा : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालया तर्फे आवाहन

राष्ट्रीय ध्वजाचा मान राखा : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालया तर्फे आवाहन

by Navswaraj
0 comment

अकोला : १५ ऑगस्टच्या स्वतंत्रता दिनानिमित्ताने भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात ५ ऑगस्ट रोजी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय तर्फे “राष्ट्रध्वजाचा मान राखा” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचावर प्रमुख वक्ता गिरीश कुलकर्णी, मुख्याध्यापक अभय वानखडे व प्रमुख पाहुणे पुरूषोत्तम खोत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.

महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासाच्यावतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना गिरीश कुळकर्णी यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू , मदनलाल धिंग्रा, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्रवीर सावरकर या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सरवस्वाचा त्याग केल्याचे सांगितले.

भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे जतन करणे गरजेचे आहे. वाढदिवस इंग्रजी पद्धतीने साजरा न करता तिथी नुसार करावा. दूरध्वनीवर बोलतांना हॅलो ऐवजी नमस्कार म्हणावे. व्हॅलेन्टाईन डे, फ्रेंडशिप डे, रोज डे ऐवजी रक्षाबंधन साजरा करावा. नववर्ष ३१ डिसेंबरला साजरा न करता गुडीपाडव्याला करावा असे कुळकर्णी म्हणाले. राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व त्यांनी विषद केले.

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या संस्कृतीचे जतन झालेच पाहिजे असे प्रमुख अतिथी खोत म्हणाले. आजचे विद्यार्थी हे भविष्याचे जबाबदार नागरिक आहेत, त्यांना शिक्षक आणि पालकांनी योग्य रित्या घडवावे असे ते बोलले.

राष्ट्रध्वज प्रत्येक नागरीकाचा जीव की प्राण आहे. त्याचा अवमान होता कामा नये, कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज पायदळी तुडवल्या जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे अध्यक्षीय समारोपात वानखडे यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाला विद्यालयातील ६०० वर विद्यार्थी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रभुदास बावणे यांनी केले. निलेश देशपांडे यांचे आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!