Home » भाजपात प्रदेशानंतर जिल्हास्तरावरही होणार बदल

भाजपात प्रदेशानंतर जिल्हास्तरावरही होणार बदल

by नवस्वराज
0 comment

अकोला : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीने राज्यातील सर्व जिल्हा, ग्रामीण व महानगर कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे बदल करण्यात येणार आहेत.

भारतीय जनपा पार्टीने नुकतेच प्रदेश कार्यकारिणीत बदल केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जम्बो कार्यकारिणी घोषित केली. प्रत्येक विभागातील राजकीय समिकरण लक्षात घेता हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल करण्यापूर्वी भाजपाने अंतर्गत सर्वेक्षणही करून घेतले होते. याशिवाय निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीकडुन जाहीर करण्यात आलेल्या निकालांची बाजूही गृहित धरण्यात आली होती. प्रदेश कार्यकारिणीनंतर आता जिल्हास्तर, ग्रामीणस्तर आणि महानगरस्तरावरील अध्यक्षही बदलण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती एक पद हे धोरण भाजपाकडुन अवलंबिवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीवर मोठे असलेल्या नेत्यांना जिल्हास्तरावर पद मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीची तयारी म्हणून भाजपाने अंतर्गत फेरबदल सुरू केले आहे. जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपाचे राज्यस्तरावरील पदाधिकारी विविध ठिकाणी जाऊन, कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यासाठी काही बैठकांचे आयोजनही करण्यात येत आहे.

एकापाठोपाठ होत असलेल्या निवडणुकांमुळे भाजपाने राज्यात ‘मिशन 45’ हाती घेतले आहे. या मिशनअंतर्गत अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार मतदार संघांचे दौरे करीत आहेत. राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनाही मतदार संघांचे दौरे करण्यास सांगण्यात आले आहे. या दौऱ्यांतून कोणत्या नेत्याचे नाव जिल्हाध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष, महानगराध्यक्ष पदासाठी पुढे येते याची चाचपणी करण्यात येत आहे. पक्षांतर्गत विरोध, गटातटाचे राजकारण आदी सर्वांचा समावेशक विचार करून लवकरच वेगवेगळ्या जिल्ह्यातील नेतृत्व बदलण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वरिष्ठ पातळीवरून या बदलांचे अधिकार बहाल करण्यात आल्याची माहिती आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!