Home » अकोल्याच्या विजय केंदरकरांसह १२ संपादक, ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव

अकोल्याच्या विजय केंदरकरांसह १२ संपादक, ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव

by नवस्वराज
0 comment

नागपूर : अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय केंदरकर यांच्यासह १२ संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांचा व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशातील सगळ्यात मोठ्या संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार, संपादकाचा सत्कार करण्यात येणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या १६ एप्रिल रोजी होत असलेल्या विदर्भस्तरीय पत्रकारांच्या अधिवेशनात हा सत्कार करण्यात येणार आहे. यात माजी खासदार तथा लोकमत समूहाचे संपादक विजयबाबू दर्डा, चंद्रपूरचे श्रीधर सीताराम बलकी, बुलडाण्याचे अनिल केशवराव पळसकर, बल्लारपूरचे वसंत ऋषीजी खेडेकर, सिंदेवाहीचे बाबूराव विठ्ठलराव परसावार सिर्सीचे रामभाऊजी नागपुरे, ता. वडसा देसाईगंज, जि. गडचिरोलीचे शामराव मोतीराम बारई, यवतमाळचे सुरज पाटील, बुलडाण्याचे विश्वंभर त्र्यंबक वाघमारे साकोलीचे रमेश मारोतराव दुरुगकर, लाखंदूरचे भाऊराव पंढरीनाथ रामटेके यांचा समावेश आहे.

पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबविणारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ही संघटना देशातील पत्रकारांसाठी हक्काची चळवळ बनली आहे. संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. अवघ्या दोन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे जाळे २८ राज्यात व सर्व केंद्रशासित प्रदेशात पसरले आहे. संघटनेने २६ हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. या संघटनेचे अधिवेशन रविवार, १६ एप्रिल २०२३ रोजी किंग्जवे ऑडिटोरिअम (परवाना भवन) कस्तूरचंद पार्कजवळ नागपूर येथे होत आहे.

विदर्भस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन दुपारी १२ वाजता केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, मुख्य वक्ते म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरेगेवार, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांची उपस्थिती राहील.

अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष मनोगत आणि अहवाल सादरीकरण करतील. दुपारच्या दुसऱ्या सत्रात ‘बदलती पत्रकारिता आणि आव्हाने’ यावर राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत आहे. यात श्रीपाद अपराजित (संपादक, महाराष्ट्र टाइम्स), देवेंद्र गावंडे (संपादक, लोकसत्ता), शैलेश पांडे (संपादक, तरुण भारत डिजिटल) आदी मान्यवर सहभाग घेतील.

तिसऱ्या सत्रात व्हॉईस ऑफ मीडियाच्या विविध विंगचे प्रदेश अध्यक्ष मनोगत आणि सादरीकरण करतील. पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा, उपायांवर मंथन होईल. व्हॉईस ऑफ मीडियाची भूमिका, भविष्यातील उपक्रम आदींची माहिती देण्यात येईल. या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन पत्रकारांच्या हक्कासाठीच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटिक, पालक सचिव (विदर्भ) संजय पडोळे, संयोजक तथा नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर, शहर अध्यक्ष फहीम खान, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे (बुलडाणा), अमर घाटरे (अमरावती), नंदकिशोर परसावार (भंडारा), भागवत मापारी (वाशीम), संजय राठोड (यवतमाळ), प्रमोद पाणबुडे (वर्धा), व्यंकटेश दुडमवार (गडचिरोली), संजय खांडेकर (अकोला), प्रमोद नागनाथे (गोंदिया) आणि विदर्भ कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!