Home » सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण : दिलीप बेतकेकर

सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण : दिलीप बेतकेकर

by Navswaraj
0 comment

अकोला : शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करण्याकरिता विद्या भारतीने ‘कोविड-१९ नंतरचे प्राथमिक शिक्षण व भेडसावणार्‍या समस्या’ या विषयावर दिलीप बेतकेकर यांचे जाहीर व्याख्यान एल.आर.टी. कॉमर्स कॉलेज येथे आयोजित केले होते.

सरस्वती पूजन व वंदनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. उपस्थित मान्यवर प्रमुख वक्ते दिलीप बेतकेकर, बीजीई सोसायटीचे अध्यक्ष मोतीसिंह मोहता व विद्या भारतीचे अकोला जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खारोडे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राम देशमुख यांनी विद्या भारतीच्या कार्याची माहिती विषद करीत विद्या भारतीच्या देशात 13 हजार शाळा असून कोणतेही सरकारी अनुदान न घेता समाजाच्या मदतीने उत्तम शाळा चालवीत असल्याचे सांगितले. आज विद्या भारतीच्या कार्याला 72 वर्ष पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख वक्ते दिलीप बेतकेकर यांनी आपल्या भाषणात आई, वडील हे मुलांचे पहिले गुरू आहेत आणि शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. बालक हे राष्ट्राचे बळ असून आईची कुस जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे. प्राथमिक शिक्षण हेच खरे शिक्षण आहे. सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण आहे. शाळेतील शिक्षण जन्मभर पुरत नाही म्हणून ग्रंथ वाचन केले पाहिजे. सोळाव्या वर्षापर्यंत स्वावलंबनाचे शिक्षण आणि सोळाव्या वर्षानंतर स्वावलंबनाने शिक्षण, भारतात शिक्षण आहे पण शिक्षणात भारत नाही. मुलांच्या बौद्धिक विकासात संस्कृत शिक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय शिक्षणाच्या सुत्रांकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपण त्याचे परिणाम भोगतो आहे. भारतात परीक्षा पद्धत आहे पण शिक्षण पद्धत नाही. भारत हा एकमेव असा देश आहे ज्या ठिकाणी त्या देशातील लोकांना आपल्या देशाच्या संस्कृतीचा तिरस्कार करणे शिकवले जाते. ज्या परकीय आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केले त्यांचे कौतुक करणे आपल्या मुलांना शिकवल्या जाते. दिलीप बेतकेकर यांनी आपल्या उद्बोधनात कोविड १९ नंतरचे प्राथमिक शिक्षण, भेडसावणाऱ्या समस्या व समाधान या विषयांवर उपस्थित पालक-शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांशा देशमुख, प्रास्ताविक परिचय गिरीजा कानडे यांनी केला. वंदे मातरम योगेश मल्लेकर यांनी गायले. कार्यक्रमाला नरेंद्र देशपांडे, डॉ. राम देशमुख, शैलेश जोशी आदी उपस्थित होते. अकोल्यातील पंचवीस शाळांचे संस्था चालक, गणमान्य नागरिक, शिक्षक- पालकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!