Home » चिखलीत ‘स्कार्फधारी’ महिलेकडून ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड

चिखलीत ‘स्कार्फधारी’ महिलेकडून ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : चिखलीत ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर (चिखली) यांच्या वाहनाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही तोडफोडीची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खेडेकर यांच्या निवासस्थान परिसरात उभ्या असलेल्या त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’ वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे आज, सोमवारी आढळून आले. यामुळे खेडेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमा झाले. ‘सीसीटीव्ही’ फुटेजवरून रविवारी रात्री १२ वा. च्या सुमारास वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला तेथे आली, तिने आजुबाजूला बघितले आणि वाहनाची व शिवसेनेच्या ‘लोगो’ ची तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचे हे कृत्य कैद झाले आहे. यानंतर खेडेकर यांनी चिखली पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या एका इसमाने सीसीटीव्हीच्या रेंज बाहेर वाहन थांबवले. नंतर त्यावरून उतरलेल्या महिलेने वाहनाची तोडफोड केली. पोलीस तपास करणारच आहे, मात्र महिलेच्या आडून हा भ्याड प्रकार करणाऱ्यास आम्ही शोधून काढू, असा इशारा खेडेकर यानी दिला. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ठाकरे गटाचा बुलढाणा बाजार समितीत आयोजित कार्यक्रम शिंदे गटाने उधळून लावला होता. नोव्हेंबर महिन्यात मोताळा तालुक्यातील २ युवा पदाधिकाऱ्यांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. आता चिखलीत वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!