Home » सनातन धर्म संपवण्याची भाषा बोलणाऱ्यांविरुद्ध कारवाई का नाही : चेतन राजहंस 

सनातन धर्म संपवण्याची भाषा बोलणाऱ्यांविरुद्ध कारवाई का नाही : चेतन राजहंस 

by Navswaraj
0 comment

अकोला : सनातन धर्माला संपवण्याविषयी ‘हेट स्पीच’ करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित करून, सनातन धर्माच्या रक्षणासाठी सनातन संस्था ‘सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार असल्याची माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी हाॅटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतानाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एचआयव्ही या रोगांशी तुलना करून सनातन धर्म संपवण्याची अतिरेकी आणि शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलतात. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रात निखिल वागळे यांच्यासारखे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्म संपवण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून, सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, अशा प्रकारची विषारी टीका करतात.

सर्वोच्च न्यायालयाने २८ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, जर कोणी ‘हेटस्पीच’ करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्वतःच दखल घेऊन प्राथमिक तक्रार (FIR) दाखल केली पाहिजे. यात सरकारने विलंब केल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानले जाईल. इतका स्पष्ट आदेश असतांनाही १०० कोटी समाज असणाऱ्या सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल का झालेला नाही ? त्यामुळेच सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणाऱ्यांच्या विरोधात ‘सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सनातन धर्मियांत जागृती करणारी व्याख्याने आयोजित करणे, बैठका घेणे, तसेच ‘हेटस्पीच’ करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे, अशा प्रकारच्या कृती करण्यात येणार असल्याची माहिती चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.

सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वप्रथम जे.एन.यु. मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’ च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाने हिंदुत्व संपवण्यासाठी परिषद घेतल्या गेल्या. याला विरोध झाल्यावर ‘आम्ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही, तर राजकीय हिंदुत्वाच्या विरोधात आहोत’ असा खुलासा केला गेला, मात्र आता तर ‘सनातन धर्म’ संपवण्याचीच भाषा केली जात आहे. ओवैसीच्या १०० कोटी हिंदूंना संपवण्याच्या भाषेपेक्षा हे वेगळे काय आहे? ‘हेटस्पीच’ च्या खटल्यात, सर्वाेच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी ३० गुन्हे नोंदवल्याचे सांगितले आहे. त्यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदु समाजाच्या ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ तील हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात दाखल केले गेले आहेत. हे गुन्हे दाखल करण्याच्या मागे शहरी नक्षलवाद्यांशी जोडलेल्या वामपंथी विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस अॅण्ड पीस’ या संघटनेचा हात आहे, मात्र या संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, आव्हाड यांचे विरोधात ‘हेटस्पीच’ चा एकही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे एकूणच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या विचारसरणीच्या शहरी नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासह त्यांची ‘एनआयए’ कडुन चौकशी करण्यात यावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी असल्याचे चेतन राजहंस यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला शिवसेना महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, राष्ट्रजागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष संजय ठाकूर, हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, हिंदू जनजागृती समितीचे अकोला जिल्हा समन्वयक अमोल वानखडे आणि इतर हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!