सजीव सृष्टीत पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशात उत्सवाच्या काळात कधी कधी वाहनांची स्वच्छता, घराच्या परिसराची स्वच्छता अनावधानाने पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. हा अपव्यय नागपूरकरांना भविष्यात त्रासदायक ठरू नये यासाठी काही उपाय केलेले बरे.
– श्वेता बॅनर्जी
(लेखिका नागपूर महापालिकेतील जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता व जलतज्ज्ञ आहेत.)
नागपूरला हिवाळ्याच्या काळात सर्वसाधारणपणे ६३० ते ६५० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. यातील काही पाण्याचा अपव्यय होतो. लिकेजेस आदींवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर महापालिका २४ तास अव्याहत प्रयत्न करीत असते. अशात नागरिकांनीही उत्सवांच्या काळामध्ये पाण्याचा अपव्यय कमी करणे गरजेचे आहे. होळी, कृष्ण जन्माष्टमीदरम्यानचा दहीहंडी उत्सव, दसरा, दिवाळी या काळात ही खबरदारी घेणे खरे तर गरजेचे आहे. होळीच्या काळात पाणी मिश्रित रंग खेळण्याऐवजी कोरड्या व ईको फ्रेन्डली रंगांनी हा उत्सव साजरा केल्यास त्यातून पर्यावरणाची हानी व जल अपव्यय तर टळेलच याशिवाय रंगांमधील हानीकारण घटकांमुळे मेंदूच्या क्रियेत होणारा बिघाड अर्थात नर्व्ह इल्पल्सही टळेल.
होळीनंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात वाहनांची स्वच्छता, घराच्या परिसराची स्वच्छता यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशावेळी पाईप लाऊन थेट वाहने धुणे टाळता येऊ शकते. यासाठी थेट पाईप न लावता बादलीत पाणी घेऊन वाहनांची स्वच्छता करता येते. दिवाळीच्या काळात घरं धुताना थेट पाईपचा वापर न करता पोछा किंवा स्प्रे यंत्राचा वापर करता येईल. सर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अपव्ययाबद्दल काही निर्देश दिले आहे. त्यानुसार स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे पाणी पूर्णपणे अपव्ययाच्या वर्गवारी मोडत नसले तरी, त्याचे योग्य नियोजन करून या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचीही बचत करणे शक्य आहे.
एका ठिकाणी माझ्या असे वाचण्यात आले की वास्तुशास्त्रातही पाण्याच्या बचतीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन करायचे असल्यास पाण्याची बचत करणे खुपच गरजेचे आहे. पृथ्वीवरील काही स्रोत संपल्यास कृत्रिम पद्धतीने त्याची निर्मिती करता येते. परंतु पाण्याचे स्रोत संपल्यास कृत्रिम पाणी तयार कसे करायचे व ते संपूर्ण सजीव सृष्टीला कसे पुरवायचे या शोध अद्यापही लागलेला नाही. हा शोध लागला तरी कृत्रिमपद्धतीने तयार करण्यात आलेल्या पाण्यापेक्षा निसर्गनिर्मित जलस्रोत केव्हाही वापरणे केव्हाही हिताचेच आहे. त्यामुळे ‘जल ही जीवन’ हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.