अमरावती : शिंग असलेल्या सापाचा व्हिडीओ अमरावतीत चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल माध्यमांवर या व्हिडीओने चांगलेच ‘व्ह्यू’ मिळविले आहे. वेगाने परसलेल्या या व्हिडीओमुळे सर्पमित्र आणि वन्यप्रेमींमध्येही उत्सकता वाढली होती. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आणि शिंग असलेल्या सापाबाबत तथ्य पुढे आले आहे.
एका शेतातून जाणाऱ्या या सापाचा व्हिडीओही खरा आहे आणि त्याला दिसणारे शिंगांसारखी वस्तूही खरी आहे. परंतु हे वास्तविक शिंग नाहीत. व्हिडीओतील साप नानोटी प्रजातीचा आहे. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिनविषारी साप आहे. शांतपणे जाणारा व कुणावरही हल्ला न करणारा हा साप आहे. नानोटी प्रजातीच्या सापाला शिंग नसतात असे सर्पतज्ज्ञांनी सांगितले. व्हिडीओत दिसणारे शिंग मूळात एका बेडकाचे पाय आहेत. सापाने शेतातून जाताना एका बेडकाची शिकार केली. आपले भक्ष्य घेऊन पुढे आता असताना बेडकाचे दोन पाय त्याच्या तोंडातून बाहेर आले व ते एखाद्या शिंगाप्रमाणे दिसू लागले. व्हिडीओचे व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर सापाच्या तोंडातील बेडूक दिसतो. या बेडकाला साप कधी गिळण्याचा प्रयत्न करताना दिसते तर कधी बेडूक थोडा बाहेर आल्यासारखा दिसतो.