Home » आधीच गर्भवती असलेल्या तरुणीने लग्न करीत नागपुरातील तरुणाला फसविले

आधीच गर्भवती असलेल्या तरुणीने लग्न करीत नागपुरातील तरुणाला फसविले

by नवस्वराज
0 comment

नागपूर : प्रियकराकडून तीन महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे तरुणीच्या प्रियकराने व नातेवाईकांनी घाईगडबडीत नागपुरातील एका तरुणाशी लग्न लावून दिले. डॉक्टरांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह तिच्या नातेवाईकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रोशन नावाचा तरुण नागपुरातील यशोधरानगरात राहतो. तो खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचे कुटुंब रोशनच्या लग्नासाठी मुली बघत होते. दरम्यान, एका नातेवाईकाच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा शहरातील सरिता (वय २८) हिच्याशी रोशनचे लग्न जुळले. धुमधडाक्यात लग्न पार पडले. दोघांचाही संसार व्यवस्थित सुरू झाला.

लग्नानंतर १५ दिवसानंतर सरिताचे पोट दुखायला लागले. तिला सासूने दवाखान्यात नेण्यास सांगितले. परंतु, ती दवाखान्यात जाण्यास वारंवार नकार देत होती. महिन्याभरानंतर तिला रोशनने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून रोशनला वडील होणार असल्याची बातमी दिली. सरिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच रोशनला धक्का बसला. लग्नाला फक्त एक महिनाच झाल्याचे सांगताच डॉक्टरांनी याप्रकरणातून काढता पाय घेत दुसऱ्या दवाखान्यात जाऊन तपासण्याचा सल्ला दिला. सरिताला कुटुंबीयांनी सत्यता सांगण्यास भाग पाडले. तिने प्रियकराकडून गर्भवती झाल्याची कबुली दिली.

सरिताने प्रियकर संजय (वय ४०) याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. पती व सासू घरी नसल्याचे बघून तो नागपुरात आला आणि प्रेयसीला पांढुर्णा गावी घेऊन गेला. सरिताने पतीच्या घरातील सोन्याचे दागिने आणि पैसेही प्रियकराच्या स्वाधीन केले. प्रियकराच्या मदतीने गर्भपात केला. त्यानंतर तीने पती रोशनवर छिंदवाडा कौटुंबिक न्यायालयात खावटीचा दावा करीत पैसे उकळणे सुरू केले. त्यामुळे रोशन त्रस्त होता.

अशात सरिताची आई नंदा, भाऊ प्रवीण यांच्या मदतीने प्रियकर संजयने सुजीत नावाच्या दुसऱ्या युवकासोबत प्रेयसीचे लग्न लावून दिले. संजयने स्वत:ला मावस भाऊ असल्याचे सुजीतला सांगितले. त्यामुळे तो वारंवार प्रेयसीला भेटायला दुसऱ्या नवऱ्याच्या घरी येत होता. दुसऱ्या पतीपासून सरिताला मुलगी झाली. याबाबत रोशनला माहिती मिळाली. त्यामुळे रोशनने पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांनी तक्रारीवरून रोशनची पत्नी, तिचा प्रियकर, सासू आणि भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

error: Content is protected !!