मुंबई : ‘कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले’, अशा भावनिक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीनंतर पक्षात कायम राहिलेल्या आमदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शिवसेनेच्या 40 आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय- उतार व्हावे लागले. अद्यापही हे बंड शांत झालेले नाही. 15 आमदारांनी न डगमगता उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. या 15 निष्ठावान आमदारांनी आपल्याला साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहे.
“आईच्या दुधाशी कधीही बेइमानी करू नका. हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत निष्ठावान राहिलात. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना” असल्याचे आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली. शिवसेनेचे आमदार म्हणून, तुम्ही केलेले निष्ठेचे पालन यातून बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही पाईक आहात”, हे दाखवून दिले असल्याचे पत्रातून उद्धव ठाकरे म्हणाले आहे.