Home » जुने तेच पारंपरिक होमिओपॅथीतील आहे अस्सल दर्जाचे सोने

जुने तेच पारंपरिक होमिओपॅथीतील आहे अस्सल दर्जाचे सोने

by Navswaraj
0 comment

– डॉ. शैलेश गांगलवार

होमिओपॅथीचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने भारताच्या पश्चिम बंगाल प्रांतात प्रवास करण्याचा योग आला. होमिओपॅथीतही अॅलोपॅथीप्रमाणे एखाद्या रोगाचा उपचार करणारे स्पेशलिस्ट आहेत; जसे स्त्री रोग तज्ज्ञ, कॅन्सर तज्ज्ञ. अशा तज्ज्ञांचा शोध घेत घेत कोलकाता शहरात पोहाचलो आणि तेथे कळले की ती म्हण खरी आहे ‘जुने ते सोने….’

कोलकातामध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस अगदी साधेपणाने केली जाते. तेथील होमिओपॅथी क्लिनिकमध्ये फारसा तामझाम नसतो. काही दवाखाने तर अगदी छोटे असतात. पूर्वीच्या काळी काळ्या रंगाची विजेची बटने येत होती, ती आजही कोलकात्यात वापरली जातात. याच जुन्या सोन्याची जपणूकही कोलकात्यातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी केली आहे. पश्चिम बंगाल भागातील होमिओपॅथी डॉक्टर पारंपरिक होमिओपॅथीची आजही प्रॅक्टिस करतात. याचा अर्थ बाकीचे करत नाही असा मुळीच नाही.

पश्चिम बंगालमधील एका होमिओपॅथी क्लिनिकचे प्रातिनिधिक छायाचित्र.

कोलकातामध्ये औषधोपचाराचा नवीन प्रकार बघायला मिळाला, तो म्हणजे एक लिटर पाण्यातून औषध देणे. येथील होमिओपॅथीचे अनेक डॉक्टर एक लिटर पाण्यात होमिओपॅथीच्या औषधाची फक्त एक गोळी टाकतात. त्यातून औषधाचे डायल्युशन तयार होते. औषधयुक्त हे एक लिटर पाणी मग रुग्णाला पिण्यासाठी दिले जाते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पश्चिम बंगालमधील होमिओपॅथी डॉक्टर सिंगल रेमेडीवरच भर देतात. सिंगल रेमेडी म्हणजे एकावेळी एकच औषध देणे. अलीकडे बाजारामध्ये होमिओपॅथीचे रेडिमेड औषधी मिळतात. या रेडीमेड औषधांमध्ये त्या रोगावर उपचार करणाऱ्या अनेक होमिओपॅथी औषधांचे मिश्रण केलेले असते. भारताच्या पश्चिम बंगाल भागात ही बाब टाळलीच जाते.

पश्चिम बंगालमधील फारच मोजक्या डॉक्टरांच्या टेबलांवर मला लॅपटॉप दिसला. रुग्णांची लक्षणे आणि अचूक औषध शोधण्यासाठी आजही ही मंडळी होमिओपॅथी वैद्यकशास्त्राच्या प्राचीन ग्रंथांचा आधार घेतात. हे बघीतल्यावर मलाही आनंद झाला; कारण मी देखील समोर लॅपटॉप ठेऊन रेडिमेड औषध शोधण्याचे टाळतो. बरेच जणांना ही बाब खटकतेही. कधी रुग्ण मला गमतीत म्हणतात ‘डॉक्टर साहेब, ते मागच्या वेळी कॉम्प्युटरमध्ये पाहुन औषध दिले होते ना… त्याने आराम पडला..’ खरे सांगायचे तर हा सगळा मानसिकतेचा खेळ असतो. कॉम्प्युटरमध्ये पाहिले किंवा डॉक्टरांनी रुग्णाला हसून तुम्हाला काहीही झालेले नाही हो.. असे म्हटले म्हणजे डॉक्टरने गंभीरतेने औषधोपचार केला नाही, असे अजिबात नसते. महत्वाचे असते लक्षणांच्या आधारावर अचूक औषध शोधुन काढणे आणि रुग्णावर उपचार करणे. ही अचूकता कशी येते तर सखोल अभ्यासाने. एखाद्या रुग्णाला भविष्यात कोणता त्रास होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी जसे त्याच्या जुन्या बाबींकडे दुर्लक्ष करता येत नाही अगदी त्याच प्रमाणे जुने ते सोने असलेल्या ‘ट्रॅडिशनल होमिओपॅथी’लाही मागे टाकता येणार नाही.

(लेखक अकोला येथील होमिओपथीचे तज्ज्ञ आहेत.)

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!