Home » लोखंडी सळाखी घुसून तीन ठार; खड्डा चुकविताना अमरावतीजवळ भीषण अपघात

लोखंडी सळाखी घुसून तीन ठार; खड्डा चुकविताना अमरावतीजवळ भीषण अपघात

by Navswaraj
0 comment

अमरावती : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अमरावतीत-नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात लोखंडी सळाखी घुसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात ईतका भीषण होता की महामार्गाच्या दोन्ही बाजूने आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अमरावती ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाने ‘नवस्वराज’ला दिलेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून कांदा घेऊन जाणारा ट्रक मार्गस्थ होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने लोखंडी सळाखी घेऊन जाणारा ट्रक कांद्याच्या ट्रकवर आदळला. धडकेमुळे लोखंडी सळाखी दोन्ही ट्रकमधील चालक, क्लिनरच्या शरीरात आरपार घुसल्या. घटनेचीह माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी व आसपासच्या नागरिकांनी धावाधाव करीत अपघातस्थळ गाठले. क्रेन्सच्या मदतीने दोन्ही ट्रक बाजूला करण्यात आले व महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तिसऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली; मात्र सायंकाळी साडेचारपर्यंत अमरावती ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाजवळ केवळ तीनच जणांच्या मृत्यूची नोंद होती.

अतिवृष्टी व पुरामुळे विदर्भातील बहुतांश महामार्ग खराब झाले आहेत. अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांची देखील दुरवस्था झाली आहे. रस्ते व पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अमरावती जिल्ह्यातील या अपघातालाही रस्त्यावरील खड्डा कारणीभूत ठरला आहे. मात्र राज्य सरकारचे व महामार्ग प्राधिकरणाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने लोकांचा नाहक बळी जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!