Home » भेंडवळच्या घटमांडणीत सर्वसाधारण पावसाचा अंदाज

भेंडवळच्या घटमांडणीत सर्वसाधारण पावसाचा अंदाज

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पुंजाजी महाराज व श्री शारंगधर महाराज यांनी आज रविवारी घटमांडणीतील अंदाज वर्तविले. या अंदाजानुसार देशाचा राजा कायम राहील. मात्र, राजा कायम तणावात राहील. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताण निर्माण होईल तसेच आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील तर घुसखोरी,रोगराई वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भेंडवळ येथे घटमांडणी करून भविष्य वर्तवण्याची परंपरा तब्बल ३५० वर्षे जुनी आहे.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या घटमांडणीची सुरुवात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावाबाहेरील शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात आली. या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर ,उडीद, मूग ,हरभरा, जवस, तीळ, बाजरी, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी ,वाटाणा, मसूर ,आणि करडी असे अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात आले. मध्यभागी चार मातीची ढेकळे ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली. घागरीवर पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी, कुरडई, भजे, वडे हे खाद्यपदार्थ ठेवले गेले. रात्रभर या ठिकाणी कोणीही नागरिक जात नाही आणि आज रविवारी सकाळी या धान्याच्या झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून श्री सारंगधर महाराज व श्री पुंजाजी महाराज यांनी पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला.

कपाशीचे पीक सर्वसाधारण येईल, तूर पीक चांगले येईल, ज्वारीचे पीकसुद्धा चांगले येईल व भावातसुद्धा तेजी राहील. मुग, उडीद पीक साधारण राहील. बाजरी पीक चांगले येईल. परंतु, नासाडी होईल. भादली पिक सर्वत्र विखुरलेले असल्याने भादली हे रोगराईचे प्रतीक असल्याने सर्व जगावर रोगराईचे संकट ओढवेल. गव्हाचे पीक चांगले येईल व भावात तेजी राहील. हरभरा पीक साधारण येईल. तांदूळ पीक चांगले येईल व भावात तेजी राहील. बाजरी पीक साधारण येईल पण नासाडी होईल, मठ पीक साधारण येईल.

चार ढेकळांवर ठेवलेल्या घागरीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे यावर्षी पावसाळा साधारण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहिल्या जून महिन्यात पावसाळा कमी राहील. कुठे पाणी कमी तर कुठे जास्त पडेल. त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही. तर, जुलै महिन्यात पावसाळा साधारण राहील. ऑगस्ट महिन्यात अधिक पावसाळा होईल. तर, शेवटच्या सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस येईल. परंतु, अवकाळी पाऊस राहील. त्यामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे, असे भाकीत शारंगधर महाराज यांनी व्यक्त केले आहे. करडी पीक चांगले असल्याने देशाचे संरक्षण खाते मजबूत राहील, संरक्षण खात्याला परकीय घुसखोरीला सामना करावा लागेल, त्यामुळे देशाची परिस्थिती व राजा सुद्धा तणावाखाली राहील. यावर्षी घटामध्ये करंजी असल्यामुळे करंजी हे आर्थिक परिस्थितीचे प्रतीक असल्यामुळे या वर्षी आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील, संपूर्ण शेतकरी वर्ग या मांडणीचे भाकीत ऐकून पीक पेरणी करत असतात त्यामुळे घटमांडणीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!