अकोला : अकोल्यात ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी डफडे वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
अकोला जिल्ह्यात अजित 115 सोबत अजित 105 हे बियाणे शेतकऱ्यांना जबरदस्ती घ्यावे लागत आहे. त्यातही अजित 115 हे बियाणे उपलब्ध नाही. ते उपलब्ध करून देण्यात यावे. बंद पडलेली लिंकिंग सेवा त्वरित सुरू करावी. या मागण्यांसाठी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कक्षात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान डफडे वाजवून प्रशासनाला झोपेतून जागविण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात विविध मुद्द्यांवर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला दिसून येत आहे. शिवसेनेचा स्थापना दिवस असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचा विषय, ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमकपणे काम करीत आहेत. अकोल्यातील अनेक मुद्द्यांवर आतापर्यंत ठाकरे गटाने आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही ठाकरे गट आंदोलन करीत आहे.