Home » ‘लालाजी’बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस झालेत भावूक

‘लालाजी’बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस झालेत भावूक

by Navswaraj
0 comment

अकोला : प्रदीर्घ आजारामुळं भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं शुक्रवारी (ता. ३) निधन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शनिवारी (ता. ४) अकोला गाठत आमदार शर्मा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं व शर्मा परिवाराला धीर दिला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘काही नेते हे जवळ फोन असतानाही लवकर उपलब्ध होत नाहीत. मात्र आमचे ‘लालाजी’ तसे नव्हते. जवळ फोन नसतानाही ते जनतेसाठी कायम उपलब्ध असायचे. त्यांचा ‘पर्सन टू पर्सन’ संपर्क असायचा. तो संपर्क कधीही तुटला नाही.’

गेल्या तीन दशकांपासून एकाच मतदारसंघातून सलग आमदार राहिलेले ‘लालाजी’ गेलेत यावर अद्यापही विश्वास बसत नाही असं नमूद करताना फडणवीसही भावूक झालेत. अकोलेकरांना लालाजी म्हणून परिचित असलेले आमदार गोवर्धन शर्मा अत्यंत निस्वार्थी नेता होते. त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी, मंत्रिपदांसाठी मोह केला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी भाजपचे नेते लालाजींच्या पाठीमागे लागायचे. त्यांना बळजबरीनं निवडणुकीत उभं करायचो, असं फडणवीस म्हणाले. आमदार शर्मा यांना सत्तेचा लोभ कधीच नव्हता. लोकांच्या सुखदुःखात धाऊन जाणारे व्यक्ती म्हणुन त्यांची ख्याती होती.

आमदार शर्मा यांनी तंत्रज्ञान, सोशल मीडिया याची चिंता कधी केली नाही. परंतु लोकांच्या मनात घर करणारं त्यांचं सोशल नेटवर्किंग खुपच बळकट होतं. लोकांनाही त्याची सवय होती. त्यामुळं लालाजी आणि मतदारांमध्ये विसंवाद झाला असं कधीच घडलं नाही. भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पक्षीय राजकारण विसरून ते सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी काम करायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!