Home » परमवीर सिंह यांचे निलंबन रद्द

परमवीर सिंह यांचे निलंबन रद्द

by Navswaraj
0 comment

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवार, १२ मे २०२३ रोजी हा मोठा निर्णय घेतला. परमबीरसिंह यांच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीरसिंह यांना बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमिततेच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही कारवाई केली होती. २०२० मध्ये परमबीरसिंह पोलिस आयुक्त असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यात अनिल देशमुख यांनी  सचिन वाझे आणि इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर मुंबईत पोलिसांपुढे शरण आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते. सुमारे सहा महिन्यांच्या निलंबनानंतर आता परमबीर सिंह पुन्हा पोलिस दलात रूजू होणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!