Home » दादा नव्हे, सुप्रिया ताईंकडे महाराष्ट्राची धुरा

दादा नव्हे, सुप्रिया ताईंकडे महाराष्ट्राची धुरा

by Navswaraj
0 comment

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्यानंतर नाट्य घडले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत होती. अखेर दोन कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले असून यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्राची धुरा अजित दादा नव्हे तर सुप्रिया ताईंकडे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांना देखील कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेल आधीपासूनच राष्ट्रीय कार्यकारिणीत सक्रिय आहेत. मी सुरुवातीपासून काम करत आलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही जबाबदारी मोठी नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. हे पद जरी नवीन असले तरी माझ्यासाठी हे काम जुनेच असल्याचे पटेल म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अजित पवार मात्र, पाण्याच्या बाटलीशी खेळताना दिसले. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली, त्यावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसून आले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिय न देता अजित पवार कार्यक्रमातून निघून गेले. अजित पवार माध्यमांना प्रतिक्रिया देणे कधी टाळत नाही. मात्र, एवढ्या मोठ्या निर्णयावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणे का टाळले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!