अकोला : ठिकठिकाणी अध्यात्मिक गुरूंचे भागवतकथा, शिवपुराण, रामायण, महाभारत अशा धार्मिक, पौराणिक कथांचे पठण सुरू आहे. कथा ऐकण्यासाठी परप्रांतील तसेच परदेशातील भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित रहातात. कथावाचक गुरूजींवर भाविकांची दृढश्रद्धा असते, त्यामुळे त्यांचा शब्द प्रमाण आणि सत्य मानल्या जातो. इंग्रजाळलेल्या सुधारणावादी विचारसरणीमुळे मध्यंतरीच्या काळात काही हिंदूंमधे नास्तिकतेची जोरदार लाट आली होती. कर्मकांड हे थोतांड आहे, अमूक गोष्ट अंद्धश्रद्धा असल्याचा दावा केल्या गेला. यात तथाकथित अंद्धश्रद्धा निर्मुलनवाले, सर्वधर्मसमभावाचा तसेच निधर्मी असल्याचा राग आळवणार्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची हिंमत हिंदुधर्मावर आसुड ओढण्यापर्यंत मर्यादित आहे. कट्टरधर्मियांबाबत बोललो तर सालपट काढले जातील याची त्यांना पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे तेथे ते लोटांगण घालतात.
अध्यात्मिक गुरूंनी कथावाचना दरम्यान हिंदूंनी आपला धर्म, संस्कार व कर्मकांडाचे पालन करावे, आपले धार्मिक ग्रंथ तसेच धर्म आणि देशासाठी बलिदान दिलेले धर्मवीर आणी क्रांतीकारकांच्या चरित्राचे वाचन करावे, घरात आवर्जून आपल्या मातृभाषेत बोलावे, आठवड्यातून किमान एक दिवस मंदिरात दर्शनासाठी जावे, पुरुष तसेच महीलांची वेशभूषा सात्विक, सोज्वळ असावी, कुटुंबसंस्थेची जोपासना करावी, ज्येष्ठांना आदरयुक्त वागणूक द्यावी, शेजारधर्म, नातेसंबंध जपावे, एकमेकांच्या सुख – दुःखात तन, मन, धनाने सहभागी व्हावे, दिवसातून किमान एक वेळ कुटुंबातील सर्व सदस्यांनी सोबत भोजन करावे, अन्नाचा आदर करावा, वाया घालवू नये, विवाहसंस्थेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच समाजाभिमुख होऊन कार्य करण्याचे आवर्जून आवाहन करावे.
पौरोहित्याचे कार्य करणार्यांना थेट यजमानांच्या देवघरात प्रवेश असतो. त्यांच्या शब्दाला पण मान असतो. त्यांनी देखील समाज जागृत व्हावा, धर्म आणी संस्कृती जीवंत रहावी म्हणून या कार्याला हातभार लावावा.