Home » अकोल्यात सोयाबीनदर सरासरी ४६०० रुपये

अकोल्यात सोयाबीनदर सरासरी ४६०० रुपये

by Navswaraj
0 comment

अकोला : बाजारात सोयाबीनचा दर सध्या स्थिरावलेला असून मंगळवारी (ता. ८) सरासरी ४६०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची विक्री झाली. गेल्या महिन्यात पावसामुळे सोयाबीनची आवक कमी झाली होती. आता पाऊस ओसरताच पुन्हा शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला सोयाबीन विक्रीला काढला आहे. त्यामुळे बाजारातील आवक सुधारत आहे.

बाजार समितीच्या क्षेत्रात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. बाजारात सोयाबीनची वर्षभर उलाढाल होत असते. प्रामुख्याने हंगामाच्या काळात आवक प्रचंड होते. आता नवीन हंगामाची लागवड झालेली असली तरी बाजारात गेल्या वर्षातील सोयाबीन येत आहे. बाजारात मंगळवारी (ता. ८) १२५३ क्विंटलची आवक झाली होती. सोयाबीनला किमान ४२०० व कमाल ४८८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४६०० रुपये भाव होता. या हंगामातील म्हणजेच नवीन सोयाबीनच्या आवकेला अद्याप अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

बाजारात तुरीचा भाव सरासरी ९५०० रुपयांपर्यंत स्थिरावला आहे. किमान ५००० ते कमाल १०३४५ रुपये भाव मिळाला. १९४ क्विंटलची आवक होती. हरभऱ्याला किमान ४३०० रुपये आणि कमाल ५२६५ रुपये दर होता. १९१ पोत्यांची आवक झाली होती. तिळाची पाच पोत्यांची आवक झाली. सरासरी १५७१२ रुपयांनी हा तीळ विकला. गव्हाची १६३ पोत्यांची आवक होती. गहू २३५० ते कमाल २५५० रुपयांदरम्यान विक्री झाला. गव्हाला सरासरी २४९० रुपयांचा भाव होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!