Home » गुवाहाटीतील पंचतारांकित 70 खोल्यांचे भाडे ऐकून थक्क व्हाल

गुवाहाटीतील पंचतारांकित 70 खोल्यांचे भाडे ऐकून थक्क व्हाल

by नवस्वराज
0 comment

गुवाहाटी : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ  शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार ८ दिवस गुवाहाटीत होते. या सर्व आमदारांचा मुक्काम रॅडिसन ब्ल्यूमध्ये होता. या पंचतारांकित सुविधांचे बिल शिंदे यांनी चुकते केले आहे. आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी असा प्रवास करणाऱ्या आमदारांवर सुमारे सव्वा कोटी खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिवसेना आमदारांचा हा सलग तिसरा ‘फाईव्ह स्टार’ मुक्काम होता. यापूर्वी राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आमदार खास हॉटेलात मुक्कामी होते. मात्र यातील गुवाहाटीतील मुक्काम सर्वांत प्रदीर्घ होता. तिथे जवळपास ८ दिवस सर्व मंत्री आणि आमदार हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये होते. हॉटेलचे बिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरले आहे. ही माहिती हॉटेल व्यवस्थापनाने प्रसार माध्यमांना दिली. शिंदे गटाच्या मुक्कामावर नेमका किती खर्च झाला याची माहिती मात्र हॉटेलकडून देण्यात आलेली नाही.

शिंदे गटाच्या मुक्कामासाठी हॉटेलच्या विविध मजल्यांवर एकूण ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. आमदारांचा मुक्काम असल्याने हॉटेल व्यवस्थापनाने २२ ते २९ जून दरम्यान अन्य ग्राहकांसाठी रेस्रॉ, बँक्वेट आणि इतर सुविधा बंद केल्या होत्या. शिंदे गटातील आमदारांचा मुक्काम सुपीरियर आणि डिलक्स खोल्यांमध्ये होता. हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या संकेतस्थळानुसार, एका खोलीचे भाडे ७५०० ते ८५०० रुपये आहे.  सवलत आणि कर धरून ७० खोल्यांचे भाडे जवळपास ६८ लाख रुपयांच्या घरात जाते. आठ  दिवसांच्या जेवणावर झालेला खर्च अंदाजे २२ लाख रुपये इतका आहे. त्यामुळे या आकड्याची बेरीज केली तर ती 90 लाख होते. यात सूरत येथील हॉटेलचे भाडे, महाराष्ट्रातून सूरत आणि त्यानंतर गुवाहाटी येथे प्रवास, गुवाहाटी येथून मुंबईत परतीचा प्रवास याचा खर्च जोडल्यास हा आकडा सव्वा कोटींपेक्षाही जास्त जाईल, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. हा आकडा खूप वरवरचा आहे. महाराष्ट्रातील या सत्तापालटासाठी झालेला छुपा खर्च प्रचंड मोठा असेल असेही विश्लेषकांचे मत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!