Home » नवनीत राणा काय होती, काय आहे हे माहिती आहे : चंद्रकांत खैरे

नवनीत राणा काय होती, काय आहे हे माहिती आहे : चंद्रकांत खैरे

by Navswaraj
0 comment

बीड : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या बाबत बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकेरी भाषेचा उल्लेख केला. ‘ती बाई काय होती, काय आहे हे माहिती आहे’, अशा शब्दात त्यांनी राणा यांना लक्ष्य केले. खासदार राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने संतापलेल्या खैरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

जळगावमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. टीका करताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. एवढी कमजोर नाही. जर तू शिवसेनावाला आहे, तू उद्धव ठाकरे आहे, तर मीही राणा आहे. मी विदर्भाची सून आहे. तुमच्यात किती ताकद आणि माझ्यात किती ताकद याचा सामना होऊनच जाऊ दे. आम्ही त्यांना अशी जागा दाखवली, की त्यांच्या घरात उभा राहणारा कार्यकर्ताही उरला नाही’, असे खासदार राणा म्हणाल्या होत्या.

राणांना प्रत्युत्तर देताना खैरे यांनी ‘आम्ही शिवसैनिक जरा वेगळेच असतो. आमची बुद्धी गुडघ्यात गेली, तर आम्ही तिथे जाऊनही राणाला पाहु शकतो’, अशा शब्दात अप्रत्यक्ष धमकीवजा ईशाराच दिला. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीही तापले होते. राणा दाम्पत्यास मुंबईत अटक करण्यात आली होती. राणा यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. आता पुन्हा राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आघाडी उघडली असून हा वाद आणखी विकोपाला जातो की काय, असे नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरून दिसत आहे.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!