Home » खासदार नवनीत राणा यांचे वडिल फरार घोषित

खासदार नवनीत राणा यांचे वडिल फरार घोषित

by नवस्वराज
0 comment

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात शिवडी न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे वडिल हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी खासदार राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढला आहे. हा वॉरंट कायम ठेवण्यात आला आहे. राणा यांच्या वडिलांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणाची सुनावणी आता १६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.

खासदार नवनीत राणा यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नवनीत राणा यांचे वडिल हरभजनसिंह यांना कोर्टाने फरार घोषित केले आहे. त्यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

अमरावती मतदार संघ अनूसुचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित होता. खोटे प्रमाणपत्र दाखवून नवनीत राणा यांनी येथून निवडणूक लढवली असल्याचा आरोप एका खटल्यात करण्यात आला आहे. राणा यांनी दाखवलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखल्यामध्ये फेरफार असल्याचे आढळून आल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजनसिंह, रामसिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात महिन्याभरात दोनवेळा वॉरंट बजावले होते. याप्रकरणी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत याप्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी याचिका केली होती. हि याचिका मुंबई सत्र न्यायालायने फेटाळून लावली.

खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी रद्द केले होते. याशिवाय राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे . उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!