Home » जलव्यवस्थापनात महाराष्ट्राची बाजी

जलव्यवस्थापनात महाराष्ट्राची बाजी

by admin
0 comment

नवी दिल्ली: जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या अशासकीय संस्थेला आणि एका वृत्तपत्राला ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ११ श्रेणीत ५७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळीवरील प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या राज्य, संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार्थींना मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे.

पश्चिम क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपंचायतीतील ज्येष्ठ समाजसेवक मधुकर गणपत डोईफोडे आणि प्राचार्य विनायक डोईफोडे यांनी स्वीकारला. सुर्डी या गावाने लोकसहभागातून पाण्याची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात केली आहे. सुर्डीमध्ये एकेकाळी दुष्काळाचे सावट होते.

उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, नगरपंचायत अध्यक्ष ममता बिपीन मोरे, नगरपंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्न‍िल महाकाळ यांनी स्वीकारला. दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्‍जीवन मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले.

उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपूरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामविकास संस्था मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दशकांपासून कार्य करीत आहे. औरंगाबादच्या दक्ष‍िणेत असणाऱ्या चित्ते नदी खोऱ्यामध्ये नदी पुनरूज्जीवन अभियानाचे काम केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!