अकोला : फॅन्सी नंबर प्लेट तसेच फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्यांवर वाहतूक पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाई करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेट अस्पष्ट आहेत. काहींना एकच तर, काही वाहने विनानंबर प्लेटची धावत आहेत. एखादा अपघात घडल्यावर वाहनचालक वाहनासह फरार झाल्यास शोध घेणे कठीण जाते.
२० ते २५ वर्ष जुनी अनेक वाहने ज्यांच्या रजिस्ट्रेशनचा कालावधी संपलेला असून रिपासींग, प्रदूषण नियंत्रणाखाली (पीयुसी) प्रमाणपत्र तसेच विमा केलेला नाही, अशी वाहने देखील रस्त्यावर धावत आहेत. वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांवर लक्ष केंद्रीत करावे. प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन ई-बाईकचा पुरस्कार करते आहे. काही ई-बाईकला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रजिस्ट्रेशन क्रमांक घेणे आवश्यक नाही. मात्र एखादा अनुचित प्रकार घडल्यास वाहनाची ओळख पटावी म्हणून शासनाने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.