Home » नागपुरातून संघ भाजपाला म्हणाले, ‘दक्ष’ता बाळगा

नागपुरातून संघ भाजपाला म्हणाले, ‘दक्ष’ता बाळगा

by Navswaraj
0 comment

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विदर्भातील भाजपाचे नेते आणि लोकप्रतिनिधींना आपला रिपोर्टकार्ड सुधारण्याची सक्त सूचना केली आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजपाचे नेते, आमदार, खासदार चालले नाही तर त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे वेळीच ‘दक्ष’ता बाळगा असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील भाजपा नेतृत्वाला दिला आहे.

गुरुवार, २० एप्रिल २०२३ रोजी नागपूरच्या अत्रे लेआऊटमधील मेघे पाॅलिटेक्निकमध्ये झालेल्या बैठकीत संघातर्फे विदर्भप्रांत कार्यवाह अतुल मोघे, क्षेत्र प्रचारक अतुल लिमये आणि प्रांत प्रचारक गणेश शेटे तर भाजपातर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह काही आमदार, खासदार उपस्थित होते. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अशा दोन भागात बैठक झाली. या बैठकीत लोकप्रतिनिधींना रिपोर्टकार्ड सुधारण्यास सांगण्यात आले. लोकांमध्ये नाराजी असलेल्या आणि स्थान धोक्यात असलेल्या लोकप्रतिनिधींना लोकांना जास्त वेळ देण्यास सांगण्यात आले. निवडणुकीला सात आठ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. त्यातच अनेक कारणांमुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. वेळीच दक्षता बाळगली नाही तर पुढे धोका होऊ शकतो हे लक्षात घेता लोकांमधील उपस्थिती वाढवावी लागेल. संघाकडून नेहमी होते तशी मदत याहीवेळी होईल, असे सांगण्यात आले.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले असले, तरी अनेक नेत्यांचे कान संघाने टोचले आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील राजकीय घडामोडींवरही बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यातच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसू शकतो याबद्दलही संघाने भाजपाला अवगत करून दिले व वेळीच ‘अतिउत्साही’ नेते, कार्यकर्त्यांना आवर घाला याबाबतची सूचनाही केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!