अकोला : समृद्धी महामार्गावर दररोज जीवघेणे अपघात घडतात. १ जुलै रोजीच्या अपघातात २५ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. अपघात घडू नयेत म्हणून महाराष्ट्र शासन देखील प्रयत्नशील आहे. समृद्धी महामार्गावर अपघात घडू नयेत म्हणून दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामीसमर्थ संप्रदाया तर्फे महामृत्युंजय मंत्राचा सव्वा कोटी जप करण्यात आला. या विरोधात अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीने दाखल केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने बुलढाणा पोलीसांनी जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गोवाचे राज्याचे संघटक सुनिल घनवट यांनी याचा विरोध केला आहे. ते म्हणाले कि हा कायदा धर्माच्या नावावर फसवणूक, आर्थिक लुबाडणूक तसेच अत्याचाराच्या विरोधात आहे. समृद्धी महामार्गावर जीवहानी होऊ नये या सद्भावनेने एखादी व्यक्ती वा संस्था स्वखर्चाने पूजाप्रार्थना, मंत्रजप, यज्ञ करत असेल तर ते गैर नाही तसेच अपराध देखील नाही. मंत्रजपामुळे नागरीकांना अडथळा वा त्यांची गैरसोय झालेली नसून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती देखील निर्माण झाली नाही. अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीच्या दबावामळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यावर कुठलेही संकट येऊ नये म्हणून दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंढरपूरला श्री विठ्ठल रूखमायी ची पूजा करून त्यांना साकडे घालतात. अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री त्यांचे निवासस्थानी व कार्यालयात पूजा व धार्मिक विधी करतात. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार काय? असा प्रश्न घनवट यांनी उपस्थित केला.
हिंदू धर्माच्या विरोधासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा दुरूपयोग सुरू असून, हे थांबवे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सुनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारा कळवले आहे.