Home » भावना गवळींना दिलासा; सईद खानला सशर्त जामीन

भावना गवळींना दिलासा; सईद खानला सशर्त जामीन

by Navswaraj
0 comment

मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांचे जवळचे सहकारी सईद खान यांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना सईद खान यांच्यावर काही कठोर अटी देखील घातल्या.

ट्रस्टच्या चौकशीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली सईद खानला सप्टेंबरमध्ये २०२१ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. गवळी या यवतमाळ वाशीम मतदारसंघाचे खासदार आहेत. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून त्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपचा हात धरल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत भाजपसोबत येण्याची मागणी केली होती. गवळी यांच्या या पत्रामुळे ईडीने आपला हात आवरता घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, इडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन ८ कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवून नेल्यासंदर्भात सईद खान यांची ३.७५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. याप्रकरणी सईद खान यांच्यावतीने त्यांचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने काही अटी व शर्तीच्या आधारावर सईद खानचा जामीन मंजूर केला.

सईद खान यांना त्यांचा पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये, पुराव्याशी छेडछाड करु नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याशिवाय तपास अधिकाऱ्यांना आपला सध्याचा पत्ता आणि मोबाइल नंबरची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. सईद खान यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!