नागपूर : हटिया-पुणे रेल्वे गाडीत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. अमरावती, बडनेरा, अकोलामार्गे मुंबईकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच गाड्या तीन ते चार तास विलंबाने धावत आहेत. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता.
मध्य रेल्वेच्या नागपूर आणि भुसावळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मार्गावरून जात असलेल्या हटिया ते पुणे गाडीतध्ये चांदूर रेल्वेजवळ तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे ही गाडी येथे आपत्कालीन व्यवस्था म्हणून थांबवावी लागली. या रेल्वेच्या पाठीमागुन येत असलेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला धामणगाव रेल्वे येथे थांबविण्यात आले. ही गाडी रात्री दहा वाजतानंतर चांदूरवरून रवाना झाली. त्यापाठोपाठ असलेल्या विदर्भ एक्स्प्रेसला तळणी येथे रोखण्यात आले. गांधीधाम एक्स्प्रेस, मेल, सेवाग्राम आदी सर्व गाड्यांना रोखण्यात आले. हटिया-पुणे गाडी बाजूला टाकण्यात आल्यानंतर एकापाठोपाठ थांबविण्यात आलेल्या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र तोपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते.
तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची वाहतूक खोळंबली असली तरी त्याचा फटका रेल्वेने प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना बसला. बहुतांश गाड्या या स्थानकांवर थांबविण्यात आल्याने प्रवाशांची अधिक गैरसोय झाली नाही, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ‘नवस्वराज’शी बोलताना सांगितले. प्रवाशांचे हाल होऊ नये आणि सुरक्षेच्या कारणांमुळे आम्ही बहुतांश गाड्या स्थानकांवर थांबविल्या होत्या असे नागपूर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.