Home » रोगराईचे संकट थोडे टळणार

रोगराईचे संकट थोडे टळणार

भेंडवळच्या घटमांडणीत वर्तविण्यात आला अंदाज

by नवस्वराज
0 comment

भेंडवळ (जि. बुलडाणा) : यंदा पावसाचे संकट कायम राहणार असले तरी साथीच्या रोगाचे प्रमाण कमी होईल, असे भाकित बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घटमांडणीत वर्तविण्यात आले आहे. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचे खासकरून शेतकऱ्याचे लक्ष लागलेले असते. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला.

गेल्या वर्षी देशावर करोनासारख्या भयंकर रोगाने आक्रमण केलं होतं. येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे, हे यावेळी जाहीर करण्यात आले. निरीक्षणानंतर वर्तविण्यात आलेल्या अंदाजात कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील. शेतमाला भावही चांगला मिळेल. वाटाणा, बाजरी, गहू, करडई पिके मध्यम स्वरूपात येतील. देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज करण्यात आला आहे.

देशाचा राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट होणार नाही. देशाचे संरक्षण चांगले राहील. परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असेही सांगण्यात आले.संरक्षण यंत्रणेवरील ताणही वाढण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत. पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असेल असे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे देशात व राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसणार आहे, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

घटमांडणी नेमकी आहे काय?

सहदेव भाडळीने प्रस्थापित केलेल्या हवामान आणि पीकपाण्याच्या अंदाजाच्या पद्धतीप्रमाणेच वऱ्हाडात त्याच कामासाठी भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे. ही घटमांडणी ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेडवळ गावात होणारी घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, बी-बियाणे कंपन्याही ‘बिझनेस’साठी येथे गर्दी करतात.

तेव्हाच्या चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. घटमांडणीनंतर वर्तवलेली गेलेली पीकपाणी, राजकीय आणि आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणते, तरी वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजही भेंडवळचे महत्त्व कमी झालेले नाही. अक्षय तृतीयेला या गावात विदर्भ, खानदेशसह अनेक भागातून शेतकरी मुक्कामाला येऊन दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची वाट पाहतात.

शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. मांडणीचे भाकित घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तविण्यात येतो. पावसाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

रामचंद्र वाघ यांनी सुमारे १६५० साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली, असे सांगण्यात येते. गावाच्या पारावरील हनुमान मंदिराच्या परिसरात आणि गावातील पूर्वेच्या शेतात अशा दोन ठिकाणी घटमांडणी केली जाते. पारावरची घटमांडणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तर शेतातील मांडणी अक्षय तृतीयेला होते. दोन्ही मांडणींचा अंदाज एकाच दिवशी अर्थातच अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सांगण्यात येतो. आज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आदींनी चंद्रभान महाराजांची परंपरा जशीच्या तशी घटमांडणी करून जोपासली आहे.

error: Content is protected !!