Home » अकोल्यात महापालिकेपुढे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अकोल्यात महापालिकेपुढे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला शहराची हद्दवाढ झाल्यानंतर अकोला महापालिकेत विलिनीकरण झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, १५ सप्टेंबरला परिवारासह आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. आंदोलनस्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. अकोला महापालिकेच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती अकोला महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यात, त्या ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना अकोला महापालिकेत सामावून घेण्यास नगर विकास विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. परंतु २०१६ पासून या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर राबवून घेण्यात येत आहे. हद्दवाढ आणि समायोजनाचा निर्णय होऊन २०२३ उजाडले तरी कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनद्वारा संचालित अकोला मनपा वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीने आंदोलन सुरू केले होते. वारंवार निवेदन, पत्र देऊनही अकोला महापालिका प्रशासन व राज्य सरकार हालेनासे झाल्याने अखेर या समितीने १५ सप्टेंबर रोजी परिवारासह आत्मदहन करण्याचा ईशारा दिला होता. ईशाऱ्यानुसार अकोला महापालिकेच्या गांधी चौकस्थित मुख्यालयापुढे शुक्रवारी सकाळपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

महापालिकेच्या आवारात अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक तैनात ठेवण्यात आले. मुख्य प्रवेश द्वाराच्या बाहेर शहर कोतवाली पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला. फिरत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आंदोलकांना शोधण्यास सुरुवात झाली. अशात अचानक ग्राम पंचायतींचे कर्मचारी घोषणाबाजी करीत आंदोलनस्थळी दाखल झाले. घोषणाबाजी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या महापालिका चौकात प्रचंड खळबळ उडाली. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी धावाधाव करीत अंगावर रॉकेल घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. या आंदोलकांना शहर कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. नगर विकास विभागाने मंजुरी दिल्यानंतरही महापालिका या कर्मचाऱ्यांचे समायोजन का करीत नाही, असा सवाल यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. समायोजनाच्या मागणीसाठी आपले आंदोलन सुरूच राहणार आहे. भविष्यातील आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला महापालिका प्रशासन व राज्य सरकार जबाबदार असेल असा ईशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी बोलताना दिला.

error: Content is protected !!