Home » एजी, बीवीजीच्या विरोधात नागपुरात ठाकरे गटाचे आंदोलन

एजी, बीवीजीच्या विरोधात नागपुरात ठाकरे गटाचे आंदोलन

by Navswaraj
0 comment

नागपूर : उपराजधानी नागपुरातील महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे भंगार विक्री आणि घनकचरा घोटाळ्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठाकरे गटाच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवार, १० मे २०२३ रोजी घोषणाबाजी करीत नागपूर महापालिकेवर धडक दिली. कडक पोलिस बंदोबस्तात मोर्चेकऱ्यांना महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मोर्चेकऱ्यांसोबत चर्चा केली. नागपुरात घनकचरा संकलन करणारी एजी, बीवीजी कंपनी मोठ्या प्रमाणावर घोटाळा करीत असल्याचा आरोप यावेळी तिवारी यांनी केला.

दोन्ही कंपन्यांना दररोज सुमारे १० लाख रुपयांचे भंगार विकण्यात येत असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. भंगार विक्री आणि घनकचरा घोटाळा करणाऱ्यांचे फोटो, वाहनांचे क्रमांक, भंगार विक्रेता व खरेदीदारांची नावे तिवारी यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्त जोशी यांना सादर केली. या कंपन्यांविरोधात फसवणुकीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणीही तिवारी यांनी यावेळी केली. आंदोलनात प्रीतम कापसे , शशीधर तिवारी, मुन्ना तिवारी, विशाल कोरके, ज्ञानलता गुप्ता, नीलिमा शास्त्री, राम कुकडे, शिवशंकर मिश्रा, सबीर खान, आशिष हाडगे, अब्बास अली, ललित बावनकर, गौरव शाहु, अभिषेक धुर्वे, किरण शेडके, गौरव मोहोड, वेंकी बिजवार, ललित बावनकर, विनोद बावनकर, बबन कोडापे आदी सहभागी झाले होते. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता होती. आता प्रशासक म्हणून आयुक्त राधाकृष्ण बी. कार्यरत आहेत. त्यांनी या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी यावेळी तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!