Home » चंद्रपूरच्या ‘ईको-प्रो’ची पंतप्रधानांकडून दखल

चंद्रपूरच्या ‘ईको-प्रो’ची पंतप्रधानांकडून दखल

by Navswaraj
0 comment

चंद्रपूर : जंगलांचा वेढा आणि वाघांचा जिल्हा म्हणुन ओखळल्या जाणाऱ्या चंद्रपुरातील ईको-प्रो या संघटनेची (एनजीओ) दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी घेतली आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी या एनजीओच्या कामांचा उल्लेख केला आहे.

बंडू धोत्रे यांनी स्थापन केलेली ही एनजीओ पर्यावरण क्षेत्रात मोलाचे काम करत आहे. वन्यजीव संवर्धन, सर्पसंरक्षण, सापांबद्दल प्रबोधन, पर्यावरण रक्षण व संवर्धन, पुरातन वास्तुंचे संवर्धन, आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य, रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन, विविध सामाजिक उपक्रम ‘ईको-प्रो’ राबवित असते. ताडोबा तसेच लोहारा जंगल परिसरातील वन्यजिवाच्या अधिवास, वन्यप्राण्याचे संचारक्षेत्र व चंद्रपुरातील पर्यावरणास धोकादायक प्रस्तावीत कोळसा खाण प्रकल्पाविरोधात इको प्रो संघटनेने यशस्वी संघर्ष केला. यासाठी दोनदा अन्नत्याग सत्याग्रहही करण्यात आला होता. नागपूर येथे २००८ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात सलग आठवडाभर या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ दिवस आंदोलन करण्यात आले. बाबुपेठ उड्डाणपुलासाठी अन्नत्याग सत्याग्रहही ‘ईको-प्रो’ने केला. वाघांच्या संरक्षणासाठी अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी संघटनेने पुढाकार घेतला. नवेगाव व जामणी गावांच्या पुनर्वसनासाठी अशासकीय संस्था असलेल्या ‘ईको-प्रो’ने काम केले. चंद्रपुरातील महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या जुन्या संचांविरोधात न्यायालयीन लढाही दिला. वन्यप्राण्याचे ‘रेस्क्यु ऑपरेशन’ राबवित शंभरावर वन्यजीवांचे प्राण वाचविले. यात वाघ, बिबट, अस्वल, मगर, रानगवे, तृणभक्षी प्राण्यांचा समावेश आहे. चंद्रपुरातील किल्ला परकोटचे २८६ दिवसांपासून स्वच्छता अभियान सुरू आहे. चंद्रपुरातील सर्व शाळांमध्ये ‘ईको-प्रो स्कुल क्लब’ची स्थापनाही करण्यात आली आहे. रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी १२ दिवस अन्नत्यात आंदोलन करण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!