Home » राजकारण, निवडणुका मद्यावरच अवलंबून : डॉ. अभय बंग

राजकारण, निवडणुका मद्यावरच अवलंबून : डॉ. अभय बंग

by Navswaraj
0 comment

वर्धा : व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून उनाड इच्छा विरुद्ध समाजहीत असा दारूचा प्रश्न आहे. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख कोटींची दारू प्राशन केली जाते. महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूमुळे भारतीय स्त्री वैधव्याची इच्छा करत आहे. मात्र राजकारण आणि निवडणुका दारुवर विसंबून असल्याने मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा उठवल्या जात असल्याचा आरोप गडचिरोली येथील शोधग्रामचे पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केला. दारूमुळे कित्येक वर्ष समाजहित धोक्यात आले आहे. मात्र दारूला शिक्षा कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असल्याची भावना बंग यांनी व्यक्त केली.

वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी परिसरात सुरु असलेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडलेल्या प्रकट मुलाखतीत ते आपल्या भावना व्यक्त करत होते. आचार्य विनोबा भावे सभामंडपात पार पडलेली ही मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाट आणि विवेक सावंत यांनी घेतली.

सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवर ही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यावर विशेष असा प्रकाश मराठी साहित्यिकांकडून टाकण्यात आलेला नाही. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले. हा इतका मोठा रंजक काळ ललित आणि बुद्धीनिष्ठतेने आता तरी साकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाष्ट्रातील ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा हे सर्वकालिक महान साहित्यिक घडले. साहित्यिकांसाठी आळंदी, देहू आणि वर्धा हे साहित्य पंढरी व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. अभय दांडेकर यांनी केले. रंजना दाते यांनी आभार मानले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!