अमरावती : दर्यापूर येथील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांच्या अन्नात प्लास्टिक आढळल्याचे संताप व्यक्त होत आहे. या वसतिगृहात ७५ विद्यार्थी राहतात. निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या शासकीय वसतिगृहामध्ये आज विद्यार्थ्यांना जेवण्यात देण्यात आलेला आहारातील पोळी मध्ये चक्क प्लास्टिक आढळले. ही बाब विद्यार्थ्याला जेवण करताना लक्षात आल्याने सुदैवाने अनुचित घटना टळली. या संदर्भात विद्यार्थ्यांनी वसतिगृह व्यवस्थापनाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित आहार बनवणाऱ्या ठेकेदारावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
संबंधित ठेकेदाराला शासनाकडून एक विद्यार्थ्यामागे ३ हजार ४५० रुपये प्रमाणे मोबदला देण्यात येतो. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यास लाखो रुपयांचे बिल भोजनापोटी देण्यात येते. त्यानंतरही विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी आता या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.