नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती 82 डॉलरपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोलियम पदार्थ 14 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट 81 डॉलरच्या खाली आणि अमेरिकी क्रूड 74 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आला आहे. हा दर जानेवारी 2022 पासून आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी पातळीवर आला आहे.
ब्रेंटच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे भारतीय रिफायनरीसाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत (इंडियन बास्केट) कमी होऊन 82 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. मार्चमध्ये ती 112,8 डॉलर बॅरल होती. एसएमसी ग्लोबलच्या एका अहवालानुसार, क्रुडमध्ये 1 डॉलर बॅरल घट झाल्याने देशाच्या तेल कंपन्यांना रिफायनिंगवर लिटरमागे 45 पैशांची बचत होते. या हिशेबाने पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे 14 रुपये कमी व्हायला पाहिजे.
चीनमध्ये सत्ताविरोधी निदर्शने आणि कोरोनाचे प्रतिबंध वाढणे. प्रतिबंध असूनही रशियाचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येणे. व्याजदर वाढल्याने अर्थव्यवस्था थंडावणे या तीन प्रमुख कारणांनी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरविण्याचे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.