Home » चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न

by नवस्वराज
0 comment

चंद्रपूर : आश्रमशाळेच्या कामासाठी घेतलेले १४ लाख ७० हजार रुपये परत मिळत नसल्याचा आरोप करीत लातुरातील एका युवकाने चंद्रपूर महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे.

मोहिते हे भाजप सरकारच्या काळात सामाजिक न्यायमंत्री असलेले राजकुमार बडोले यांचे स्वीय सहाय्यक असतानाचे हे प्रकरण असल्याचा आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लक्ष्मण राजेंद्र पवार (वय ३८) या युवकाने केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेच्यावतीने संचालित आश्रमशाळेच्या कामासाठी आपण १४ लाख ७० हजार रुपये दिले होते, असा आरोप पवार याने केला आहे. ही रक्कम परत मिळत नसल्याने पवार सध्या चंद्रपूरचे महापालिका आयुक्त असलेल्या मोहिते यांच्या कक्षात शिरला. त्यानंतर त्याने स्वत:वर चाकुने वार करून घेतले. आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक मानसिकदृष्टीने स्वस्थ नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

पवार याने याप्रकरणी लातूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. कालांतराने त्याने ही तक्रार मागे घेतली. पवार याने मंत्रालयातही आत्महत्येचा ईशारा दिला होता. त्यानंतर त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचाही ईशारा दिला. या घटनेनंतर नागपुरातील एका खात्यातून पवार यांच्या खात्यात ४ लाख रुपये जमा करण्यात आल्याचे ऑडिओ क्लिपमधुन पुढे आले आहे. क्लिप व्हायरल होताच आयुक्त मोहिते यांनी प्रसार माध्यमांना पवार व त्यांच्यात झालेले तडजोडपत्र पाठविले. तडजोड पत्रात पवार याने मोहिते यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे. २ मे २०२२ रोजीचे हे तडजोडपत्र आहे. मोहिते यांच्यासह तत्कालीन स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, भाजपचे विद्यमान आमदार सतेज पाटील कळेकर यांची नावेही आरोपकर्ता पवार घेत आहे. अशात त्याने आयुक्तांच्या कक्षातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. चंद्रपूर मनपाचे आयुक्त मोहिते यांच्यासह पवार, कळेकर आदी सर्वांनी आरोप फेटाळले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक लक्ष्मण पवार वास्तविकतेत मनोरुग्ण आहे की प्रकरण वेगळेच आहे, याचा तपास गरजेचा असल्याची चर्चा मंत्रालय व अधिकारी वर्तुळात होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!