Home » खामगाव तालुक्यातील पारखेड स्मशानभूमित अघोरी पूजा

खामगाव तालुक्यातील पारखेड स्मशानभूमित अघोरी पूजा

by Navswaraj
0 comment

खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमित झालेल्या कथित अघोरी पुजेमुळे खळबळ उडाली आहे. गावच्या स्मशानभूमितच हा प्रकार घडल्याने तर्क- वितर्कांना सुरुवात झाली आहे. अंधश्रद्धा  निर्मूलन समितीचे किशोर वाघ यांनी यासंबंधी सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

खामगाव तालुक्यातील पारखेड या गावालगतच स्मशानभूमी आहे. शनिवारी मध्यरात्री या स्मशानभूमीच्या मध्यावर अघोरी पूजा मांडण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. स्मशानभूमिच्या परिसरात हळद, कुंकू, लिंबू आणि दोरेही ठेवले होते. स्मशानभूमितील वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवण्यात आले होते. या लिंबावर सूया टोचल्या होत्या. लिंबांच्या भोवती रांगोळी, तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले होते. संपूर्ण स्मशानभूमित वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या लिंबांभोवती हळदी कुंकाचे रिंगण आढळले. हा नेमका काय प्रकार होता, हे समजू शकले नाही. स्मशानभूमित आढळलेल्या या प्रकारामुळे पारखेडचे ग्रामस्थ चांगलेच हादरले आहेत. हा जादुटोण्याचा प्रकार असून गावावर किंवा गावातील एखाद्या व्यक्तीवर, कुटुंबावर संकट ओढवणार असल्याची भीती ग्रामस्थांमध्ये पसरली आहे. अशात या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. हा प्रकार गावकऱ्यांना घाबरविण्यासाठी देखील समाजकंटकांनी केला असू शकतो असे नमूद करीत वाघ यांनी पोलिसांना तपास करण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!