Home » अकोल्याला डेंग्यूचा डंख; रुग्णालयांमध्ये वाढली गर्दी

अकोल्याला डेंग्यूचा डंख; रुग्णालयांमध्ये वाढली गर्दी

by Navswaraj
0 comment

अकोला : बदलत्या हवामामुळे अकोला जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अकोला महापालिका क्षेत्रातही डेंग्यू व चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपाकडे गेले दोन महिन्यात ४५ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही जास्त असण्याची शक्यता आहे. शहरातील अकोट फैल, शिवसेना वसाहत, डाबकी रोडसह इतरही भागात डेंग्यू व डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळत आहेत.

डेंग्यू सदृश आजाराने शहरामध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूसदृश्य रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होत आहेत. यामुळे ब्लड बँकेमध्येही प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासाच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मनपा प्रशासनाकडून डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांची पाहणी करून फवारणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी मनपा मलेरिया विभागाकडे असलेल्या १६ फवारणी कामगारांसोबतच इतर विभागातील २० कामगारांची फवारणीच्‍या कामासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गायकवाड यांनी दिली. खदान व मोठे जलाशय अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून गप्पी मासे सोडण्यात आल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

error: Content is protected !!