नागपूर : वंदेमातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या शब्दाला विरोध आहे. प्रयत्नपूर्वक काही शब्द रूढ होतात तसा वंदे मातरम आहे. यात राजकारण करण्याचा काही भाग नाही, असे राज्याचे वन तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार नागपुरात म्हणाले.
हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे या सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटला रजा अकादमीने विरोध केला आहे. लोकशाहीमध्ये त्यांनी विरोध करावा आम्हाला मत परिवर्तन करायचे आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. भारता आधी चिमूरला युनियन जॅक खाली उतरून भारतीय झेंडा फडकला होता. तीन दिवस हा भाग स्वातंत्र्यात होता. हा दिवस चिमूर क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम चालू शकतो, तर स्वतंत्र भारतात त्याला का विरोध व्हावा, असा सवालही मुनगंटीवार यांनी नमूद केला.
वंदे मातरम हा राजकीय किंवा जातीय शब्द नाही. या भूमीला नमन करणे असा त्याचा अर्थ आहे. या शब्दाला विरोध म्हणजे मातृभूमीला विरोध. वंदे मातरम म्हटले नाही तर तुम्ही आम्हाला जेल मध्ये टाकणार का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, की आपण हॅलो या शब्दला पर्यांयी शब्द वंदे मातरम हा शब्द वापरण्याची सवय करावी, असे आवाहन केले. यात ईतका बाऊ करण्यासारखे काही नाही. वंदे मातरम बाबत सरकार ठाम आहे. लवकरच त्याबाबत आदेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.