अकोला : शेतकऱ्यांना विशेषतः युरिचा खत मिळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असून शेतकऱ्यांसाठी मंगळवारी एक हजार ३५ टन युरिया खतांची रॅक उपलब्ध झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची खतांची मागणी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी १ लाख ५ हजार रासायनिक खतांची मागणी कृषी संचालकांकडे केली होती. त्यानुसार यंदा ८५ हजार ४३० मे. टन खतांचे आवंटन मंजूर झाले.
३१ जुलै पर्यंत ५४ हजार ५५ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झाला आहे. शिवाय खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके सुद्धा नेमण्यात आली आहेत. त्यानुसार तेल्हारा तालुक्यात गेल्या महिन्यात एका बोगस कंपनीला सील लावण्यात आले होते. एप्रिल ते सप्टेंबर या खरीप हंगामासाठी सदर खतांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र काही ठिकाणी साठेबाजी झाल्याने ठराविक खतांचा साठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
यंदा ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले होते. शिवाय खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके सुद्धा नेमली. दरम्यान खतांची संभाव्य टंंचाई निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खत उपलब्ध करुन देता यावे यासाठी या दोन्ही खतांचा साठा संरक्षित करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाचा ६८० तर डीएपीचा ६९० मेट्रिक टन असा एकूण एक हजार ३७० मेट्रिक टन खतसाठा संरक्षित करण्याची खबरदारी कृषी विभागाने आधीच घेतली आहे.