Home » एनएसएस ‘कॉलेज टू व्हिलेज’ मधील दुवा : डॉ. सुभाष चौधरी

एनएसएस ‘कॉलेज टू व्हिलेज’ मधील दुवा : डॉ. सुभाष चौधरी

by नवस्वराज
0 comment

नागपूर : समाजाला उपयोगी पडेल असे संशोधन विद्यापीठांमध्ये होते आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान तसेच तंत्रज्ञानात झालेले नवीन संशोधन समाजाच्या शाश्वत विकासासाठी उपयोगी पडावे. समाजाच्या शाश्वत विकासात राष्ट्रीय सेवा योजनेने ‘कॉलेज टू व्हिलेज’ यामधील दुवा म्हणून काम करावे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. केंद्र सरकारचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या सौजन्याने तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रादेशिक संचालनालयाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२३ दरम्यान निवासी राष्ट्रीय एकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे रविवार, २६ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता निवासी शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. चौधरी मार्गदर्शन करीत होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय एकता शिबिराच्या गुरुनानक भवन येथे आयोजित उद्घाटनिय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, महाराष्ट्र आणि गोवा राज्य एनएसएसचे प्रादेशिक संचालक डी. कार्तिकेयन, राज्य रासेयो अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावले, रासेयो प्रादेशिक संचालनालयातील युवा अधिकारी डॉ. अजय शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील लेखा अधिकारी मंगेश खैरनार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी आपल्याला मिळणारे ज्ञान समाजाच्या शाश्वत विकासासाठी उपयोगात आणावे असे सांगून स्वकर्तुत्वाने त्या दिशेने प्रयत्न करावा, असे आवाहन शिबिराला उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना केले. उच्च शिक्षण घेता यावे म्हणून विद्यापीठ हे युवकांना एका छताखाली आणण्याचे काम करते. राष्ट्राच्या विकासासाठी त्यांना स्वयंपूर्ण करण्याचे काम विद्यापीठ करते. सोबतच रासेयो त्यांच्यामध्ये सामाजिक भान निर्माण करते. रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता आदी विविध सामाजिक कार्य समाजाची गरज म्हणून आपण करतो. मात्र, रासेयो युवकांच्या समाजसेवेत बदल घडवून आणते. सोबतच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे त्यात आणखी बदल दिसून येणार असल्याचे कुलगुरू म्हणाले. अभ्यासक्रमातील शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी अपूरे पडते. त्याने केवळ पदवी मिळते. ज्ञान, व्यक्तिमत्वाचा विकास हा रासेयो मधून होतो म्हणून राष्ट्र तसेच समाजाच्या विकासासाठी सक्रिय पदवीधारकांची गरज असल्याचे कुलगुरू म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना राज्य रासोयो अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावले यांनी रासेयो ही राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारी संस्था असल्याचे म्हटले. विविधतेत एकता ही आमची भारतीय संस्कृती आहे. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीयच नव्हे तर जगच एक कुटुंब असल्याची शिकवण आपण देणार आहोत आणि रासेयो हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे कोठावले म्हणाले. रासेयो प्रादेशिक संचालक डी. कार्तिकेयन यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या शिबिराचे सुंदर नियोजन केल्याचे सांगितले. दिल्ली सारख्या शहरांमध्ये होते तशीच व्यवस्था येथे उपलब्ध करून दिल्याने विद्यापीठाचे त्यांनी आभार मानले. रासेयो मधून देशाच्या विकासात योगदान देणारे आणखी स्वयंसेवक तयार व्हावे म्हणून बजेटमध्ये तरतूद करण्याची विनंती युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री यांच्याकडे केल्याचे ते म्हणाले. शिवाय विद्यार्थ्यांना देखील राष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याने स्वतःचे कौशल्य पणाला लावण्याचे आवाहन केले.

रासेयोचे राष्ट्रीय शिबीर देशात कोठे ना कोठे होते. मात्र शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठाला ही संधी मिळाल्याने प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचे आभार मानले. नवीन शैक्षणिक धोरणातून आपणास भारतीय ज्ञान परंपरा शिकायची आहे. यातच शाश्वत विकासाचे बीज असल्याचे डॉ. दुधे म्हणाले. शेतीवर देशाचा विकास कसा अवलंबून आहे म्हणून आपण पुन्हा खेड्याकडे जात आहोत, असे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यापीठाचा शैक्षणिक परिसर तसेच गुरुनानक भवन येथे होणाऱ्या सहा दिवशीय राष्ट्रीय एकता शिबिराकरिता देशातील आसाम, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आणि तामिळनाडू आदी ११ राज्यातून २०० स्वयंसेवक व २० कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली आहे. शिबिरात सहा दिवस व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, गटचर्चा, मैदानी खेळ आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटननीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. मीनाक्षी कुलकर्णी यांनी केले तर आभार विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी मानले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!