Home » अर्थसंकल्पासाठी गेलेले अकोल्यातील नेते परतणार रिकाम्या हातीच…!

अर्थसंकल्पासाठी गेलेले अकोल्यातील नेते परतणार रिकाम्या हातीच…!

by Navswaraj
0 comment

प्रसन्न जकाते

अकोला : पश्चिम विदर्भातील एक दुर्लक्षित शहर.. असाच उल्लेख आता अकोल्याबाबत करावा लागणार आहे. केंद्रापासून राज्यापर्यंतच्या अर्थसंकल्पात यंदाही अकोल्याच्या वाट्याला केवळ ‘ठेंगा’च आला आहे. कोठेही वजन नसलेले नेते दोन्ही ठिकाणी गेले आणि रिकाम्या हातीच परतले, अशी अकोल्यातील नेत्यांची अवस्था झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च २०२३ रोजी सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांच्या धुव्वाधार घोषणांचा पाऊसच महाराष्ट्रावर पाडला. त्यामुळे पश्चिम विदर्भातील अकोला, वाशीम जिल्ह्याच्या वाट्याला नक्कीच काही तरी मिळणार अशी अपेक्षा नागरिकांच्या मनात होती. परंतु अर्थसंकल्पीय भाषण संपले आणि अकोल्यातील नेत्यांना रिकाम्या हातीच आता मतदार संघात परतावे लागणार आहे. त्यामुळे अकोला आणि वाशीम या दोन्ही दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या जिल्ह्यांतील सर्वचस्तरातून संताप व्यक्त होत आहे.

अलीकडेच लोकार्पण झालेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राच्या हातावरील विकास रेषाच बदलून टाकली. परंतु त्यामुळे अकोल्यातून एकेकाळी होणारी वाहतूक अन्य जिल्ह्यांकडे वळली. वाहतूक वळल्याचा हा फटका सध्या जरी स्थानिक नेत्यांना जाणवत नसला तरी भविष्यात तो निश्चितच जाणवणार आहे. समृद्धी महामार्ग होताच अकोल्यातून होणारी खासगी व एसटीची बरीचशी वाहतूक नव्या मार्गावरून वळली आहे. याची शहानिशा करायची झाल्यास महामार्गावरील वाहनांची आकडेवारी पाहता येईल. अकोल्यात रेल्वे फेऱ्यांची संख्याही भरपूर आहे, असे नाही. अकोल्यातील शिवणी विमानतळाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. रस्ते, पूल, स्वच्छता, प्रदूषण, मूलभूत सुविधाचा अभाव, गटारगंगा झालेली मोर्णा नदी, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा साऱ्याच समस्यांनी अकोला घेरले गेले आहे. परंतु नेत्यांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याच्या शिवणी विमानतळाचा उल्लेख करताच नेते बाके वाजविण्याच्या तयारीत होते. परंतु जसजसे अर्थसंकल्पीय भाषण संपत गेले तसतसे नेत्यांच्या चेहऱ्यावरचा रंगही उतरत गेला. परंतु वरिष्ठांना खुश करण्यासाठी अकोल्यात जल्लोषमय प्रतिक्रिया उमटल्या. या प्रतिक्रिया म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ असेच होते. यंदाही अकोल्याच्या वाट्याला काहीच आले नाही हे माहिती असतानाही नेते आनंदमयी प्रतिक्रिया देत होते आणि नागरिक संताप व्यक्त करीत होते. म्हणतात ना, अतिराजकारण जेथे असते तेथे विकास खुंटतो. अगदी तीच अवस्था अकोल्याची झाली आहे. हे राजकारण आता मोडीत काढण्यासाठी कुणी पुढाकार घेणार की, नेहमीप्रमाणे विकास योजनांपासून अकोल्याला वंचित ठेवून नेत्यांच्या राजकारणाची शिक्षा अकोलेकरांना भेटणार याचे उत्तर सध्यातरी कुणापाशी नाही आणि वरिष्ठांना ‘आमच्या अकोल्याला उपेक्षित का ठेवले हे विचारण्याची हिंमतही कुणात नाही.’

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!