अकोला : ‘जगातील कितीही ताकदवान व्यक्ती उतरला तरी महाराष्ट्राची अखंडता तोडता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नाकाखालुन ४० आमदार निघुन गेले. आजही लोक पक्ष सोडून जात आहेत. हे भाषणच करीत बसले आहेत. वेगवेगळे पक्ष युती करीत आहेत. मोदी हटाव हा त्यांचा एकच नारा आहे. अशात त्यात उद्धव ठाकरे नावाचा एक नेता अॅड झाला आहे. कितीही वेली एकत्र आल्या तरी मोदी नावाच्या वटवृक्षाचे काहीही होणार नाही’, असे प्रतिपादन भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 या अभियानाअंतर्गत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. टॉवर चौकातील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बानवकुळे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, डॉ. रणजित पाटील, आमदार डॉ. संजय कुटे, राजेंद्र पाटणी, आमदार वसंत खंडेलवाल, अनंतराव देशमुख, अर्चना मसने, बळीराम सिरस्कार, डॉ. आशिष देशमुख यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार सावरकर यांनी मोदी यांच्या कार्याचा गुणगौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहात आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर बोलताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील कार्यकाळाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, आगामी १५ दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे जमा होणार आहेत. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा ८० हजार कोटींचा प्रकल्प जाहीर करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की वाहुन जाणारे ६० टीएमसी पाणी अडवित वऱ्हाडाला सुजलाम, सुफलाम करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात दंगलीचे राजकारण करण्यात येत आहे. अचानक औरंग्याच्या अवलादी निर्माण कुठुन झाल्या असा सवालही त्यांनी केला. अॅड. प्रकाश आंबेडकरही औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाले याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. भारताला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज औरंग्यासमोर कसे झुकु शकतात असा प्रश्न उपस्थित करीत फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एकच महाराज असल्याचे ठाम प्रतिपादन केले.
औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन डोके टेकविणाऱ्या डॉ. आंबेडकरांसोबत युती उद्धव ठाकरे यांना चालते काय, असा प्रश्न करीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की सावरकरांचे नाव काढले की ठाकरे काँग्रेसला ईशारे देतात आणि नंतर त्यांच्यासेाबतच खुर्चीवर जाऊन बसतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हे राजकारण म्हणजे केवळ सोंग आहे. देशाला आणि महाराष्ट्राला कुणी वाचवू शकत असेल तर ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने मोदी यांचा साथ द्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. आभार माजी महापौर विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले.