Home » रेल्वेची स्थिती चांगली नाही; प्रवासात ज्येष्ठांना सवलत नाहीच

रेल्वेची स्थिती चांगली नाही; प्रवासात ज्येष्ठांना सवलत नाहीच

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासादरम्यान देण्यात आलेल्या सवलती पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले.

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी यांना विचारले की, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत पुन्हा कधी सुरू होणार? याला उत्तर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेने गेल्या वर्षी प्रवासी सेवेवर 59 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. ही खूप मोठी रक्कम आहे. ते पुढे म्हणाले की, हा आकडा अनेक राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. रेल्वेला दरवर्षी पगार बिलावर 97 हजार कोटी रुपये आणि पेन्शन बिलावर 60 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. या सगळ्याशिवाय रेल्वे 40 हजार कोटी रुपये फक्त इंधन खरेदीवर खर्च करते. अश्विनी म्हणाले, ‘गेल्या वर्षी आम्ही 59 हजार कोटी रुपये प्रवासी अनुदान दिले आहे. नवीन सुविधा सुरू केल्या जात आहेत. नवे निर्णय घ्यायचे असतील तर ते घेऊ, पण सध्या तरी रेल्वेची स्थिती चांगली नाही हे सर्वांनी बघायला हवे.

रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत कोविड-19 काळात बंद करण्यात आली होती. त्यावेळी हे तात्पुरते पाऊल मानले जात होते. यानंतर, कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यावर ती पूर्ववत होईल, अशी लोकांना अपेक्षा होती, परंतु अद्याप तसे झालेले नाही. यामुळे देशभरातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसला. ही सवलत सुरू होण्याची वाट ज्येष्ठ नागरिक पाहत आहेत. मात्र, त्याच्या आशेवर पुन्हा पाणी फिरले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!