अकोला : अकोला जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आलेल्या हेल्मेटसक्ती अंतर्गत पहिल्या दिवशी एकही कारवाई करण्यात आली नाही. आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. कदाचित रविवार असल्यामुळे पहिल्या दिवशी कारवाई टाळण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये एकाही रस्त्याची परिस्थिती चांगली नसताना पोलीस प्रशासन हेल्मेट सक्तीचा हट्ट का धरत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुणे शहरात पोलिसांनी हेल्मेट सक्ती केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांचा विरोध पाहता पुणे पोलिसांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आता ते अकोला पोलिसांना सबुरीने घेण्याचा सल्ला देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड आदी महानगरांमधील रस्ते प्रशस्त व चौपदरी आहेत. तेथे अनेक वाहन चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत. त्यामुळे अशा मोठ्या महानगरांमध्ये हेल्मेट सक्तीचा हट्ट एकवेळ समजला जाऊ शकतो परंतु अकोला सारखे छोटे शहर जिथे रस्तेच नाहीत तेथेही हेल्मेट सक्ती करणे अतिशयोक्ती वाटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान अकोल्यातील या हेल्मेट सक्तीच्या विरोधात अद्याप एकही लोकप्रतिनिधीने आवाज उठवलेला नाही.